गुरुवार, ११ जून, २०१५

सदाची कहाणी ..







ते म्हणतात सदा चुकला
भरलेला संसार सोडून  
मोहामध्ये वाहत गेला
काय कमी होते त्याला

घर होते नोकरी होती
फुल फुलले संसाराला
कुणास कळत नव्हते
काय झाले होते त्याला

कळपामध्ये माद्यांच्या
जमा एक करायाला
का अंतरातील तार सूक्ष्म
कुठली तरी जुळायला

नीती नियम संसाराचे
कायद्यात अडकलेले
विजोड जोड किती दिसती
रडत रखडत चाललेले

असा जुगार जिंदगीचा
एखादाच खेळू शकतो
धिक्कार जगी बेअब्रू होवून
प्रेमाला अन तोलू शकतो

तसा तर तो वापरूनही
तिला फेकू शकला असता
पाप लपवून ब्लॅकमेल
सहज करू शकला असता

परी त्याने स्वीकारले तिला  
मात करीत भ्याड मनावर
दुनिया म्हणते सारी जरी  
अन्याय झाला पहिलीवर

पण नियतीचा न्याय तो  
कसा कधी कुणास कळला
दुनियेचा डोळा वरती
घाव आतला कुणी पाहीला

घेता घेता अवघड वळण
दुनिया हातातून सुटली
क्षणात होती हाती अन
क्षणात प्रीती संपली

जन्म लावला पणाला ते
साध्यच हरवून गेले
जरी अभागी जीव एक तो
त्याला प्रेम होते कळले

विक्रांत प्रभाकर








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी आहे

मी आहे ******* पुंज क्षणाचे मनात दिसले  जणू अवसेला तारे तुटले ॥ प्रदीप्त मी पण नच मिटणारे उंच टोक जणू ज्वालेवरले ॥ तीच लाट जणू प...