गुरुवार, १० एप्रिल, २०२५

देणे

स्वाहा
****
हात लावता आगीस
बसे चटका जीवास 
खेळ नाही रे हा सोपा 
जन्म लागतो पणास ॥

ज्याला हवी उब थोडी 
त्याने दूरच राहावे 
तेल शोभेस उगाच
वर वर ना टाकावे ॥

असा पेटवून जाळ
मजा बसणे पाहत 
बरा नव्हे वेडेपणा  
खेळ पडे महागात ॥

स्वतः जळणे आणिक 
जगा जाळणे उगाच 
व्यर्थ मिरवणे असे
नच घडावे कधीच ॥ .

इथे सर्वस्वाचे देणे 
स्वाहा स्वधा स्वतः होणे 
नव्हे लौकिक बाजारी 
हे तो ईश्वराचे देणे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, ८ एप्रिल, २०२५

ठेवा

ठेवा
***"
पुन्हा पुन्हा किती मागु तुला देवा 
देई माझा ठेवा 
मजलागी ॥१

देई रे भाकर एक चतकोर 
तुझ्या दारावर 
याचक मी ॥२

 देई रे चिमूट तुझिया धुनीची 
स्वप्न जगण्याची 
मिटे ज्यानी ॥३

तुझिया प्रेमाचा घास अमृताचा 
अर्थ असण्याचा 
कळो जेणे ॥४

विक्रांत तृषार्थ कृपेच्या सागरा 
यावा कळवळा 
तुजलागी ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, ७ एप्रिल, २०२५

गाणे

गाणे
****
काही उरली सुरली 
माझी निरोपाची गाणी
घेई उचलूनी हाती
देई दूर वा सोडुनी ॥१
मुठ करता रिकामी 
मुठ मुठ न उरते 
होते साठवले काही 
हळू खाली ओघळते ॥२
होय होते उद्यासाठी 
काही जपले ठेवले 
काळ बंधन ओखट 
बळे वाहूनिया नेले ॥३
रिक्त मनीचे आकाश 
सारे सुटूनिया पाश 
मन झेपावते तिथे 
जिथे केवळ प्रकाश ॥४
सरे करणे धावणे 
सरे मागणे रडणे 
गाठी उसवल्या अंती 
व्हावे गाण्याविना गाणे ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

राम

राम
***
राम प्रेमाचा पुतळा 
राम भक्तीचा जिव्हाळा 
राम तारतो सकळा 
भवसागरी ॥१
राम अयोध्येचा राजा 
धावे भक्ताचिया काजा 
गती अन्य न मनुजा 
रामा विना ॥२
राम म्हणता म्हणता 
चुके यम दारवठा 
मोक्ष चालता चालता 
हातात येई ॥३
म्हणा राम एकवार 
करा संसार हा पार  
साऱ्या शास्त्राचे हे सार 
रामनाम ॥४
रामनामी सुखावला
खोटा संसार खुंटला 
उरे विक्रांत एकला 
अंतर्यामि ॥ ५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, ५ एप्रिल, २०२५

नशीब( उपक्रमासाठी)

नशीब   (उपक्रमासाठी  )
*******
घडणाऱ्या घटनांचा अर्थ कळत नाही 
क्रम उमजत नाही 
कारण मीमांसा कळत नाही 
बोल कुणाला देता येत नाही 
पण मग कुणीतरी हवेच ना 
जबाबदारी घ्यायला 
साऱ्या घटनाक्रमाची 
दुःखाची सुखाची रोगाची त्रासाची 
अनपेक्षित प्रसंगाची 
अशावेळी उभा केला जातो 
आगा पिछा नसलेला रंग रूप नसलेला 
तरीही हजार रंगात रंगवलेला 
एक नायक बहुदा खलनायक 
सारे दोष द्यायला 
नशीब म्हणतात त्याला 

जीवन आहे अपघातांची मालिका 
प्रयत्नांचा पराकाष्ठा करूनही 
न कळणाऱ्या हाती न लागणाऱ्या 
निर्णयाची गाथा 
आणि क्वचित कुणाच्या हाती येणाऱ्या 
अलिबाबाची गुहा
खरंच नशिबाचा कन्सेप्ट नसता तर
ही संकल्पना नसती तर
तर दुःखाचं गाठोड बांधून 
झोपताच नसतं आलं जगाला 
वावच नसता मिळाला 
कुणाला उद्याची स्वप्न पाहायला

नशीब आपल्याला  हा नशिबाचा 
हा प्रारब्धाचा कन्सेप्ट मिळाला आहे.
खरा आहे की खोटा आहे 
कुणास ठावूक 
पण त्याला न नाकारलेलेच बर
अन्यथा जीवन ठरेल 
केवळ एक अपघात 
कारण मीमांसा नसलेला.
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

देणे

स्वाहा **** हात लावता आगीस बसे चटका जीवास  खेळ नाही रे हा सोपा  जन्म लागतो पणास ॥ ज्याला हवी उब थोडी  त्याने दूरच रा...