शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४

प्रवास

प्रवास
******
सारा प्रवास जीवाचा चाले त्याच चाकोरीत 
जन्मोजन्मी तीच रीत प्रत्येकाची तीच गत॥ १

सखेसंबंधी नातीगोती साऱ्यांनाच असतात
पण सारेच चेहरे रंगा खाली लपतात ॥२

सगळ्यांची सुख दुःख ती तशीच असतात 
वेगळाली नाव त्यांना भोग तेच असतात 

प्रेम द्वेष वैर मैत्री आल्याविना न राहते
कुणा कमी काहीतरी कुणा अधिक मिळते ॥४

चालता चालता वाटा अरुंद होत जातात 
हळू हळू जीवलग संवादही तुटतात

कधी धरलेले हात हातातील सुटतात 
येतात जातात ऋतू पहावेच लागतात ॥६

उगाच कधी कुणाशी सलगीची उर्मी होते 
प्रतिसादा वाचून ती पुन्हा तशीच निमते 

खरोखर की सारे हे खुळे भास आहेत ते 
प्रयत्न कर करूनी मुळी कळत नसते ॥८

जेव्हा आपला मुक्काम जवळ येवू लागतो
जमवल्या सामानाचा या शीण होवू लागतो

एका झटक्यात सारी ओझी टाकून द्यावीत 
 गाणी गात शून्यातली स्वप्न मिठीत घ्यावीत ॥१०
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
 कवितेसाठी कविता .
☘☘☘☘ 🕉️ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...