सोमवार, १६ सप्टेंबर, २०२४

विसर्जन


 विसर्जन
********
भर मध्यरात्री साडेबारा वाजता 
ढोल ताशांच्या आवाजात 
देव आणणे किंवा विसर्जन करणे
हि काही भूषणास्पद आणि
तर्क शुद्ध गोष्ट नाही कुणासाठी 

पूर्वी विसर्जनाच्या वेळचे ध्वनी प्रदूषण
अभिशाप म्हणून स्वीकारायचो आम्ही 
पण आता आगमनाच्या वेळी ही ....?
हि आपली संस्कृती नाही 
हा गुन्हा आहे हा उन्माद आहे.
जमवलेल्या पैशाचा जमावाचा
सत्तेचा आणि मग्रुरीचा 
लोकांची पर्वा न करणाऱ्या बेमुर्वत 
झुंडशाहीचा गुंडशाहींचा

हा गणपती कुणाला वरदान देईल 
याची मुळीच शक्यता नाही 
कदाचित त्यांना त्याची पर्वाही नाही 
श्रींच्या विशाल कानात ढोल ताशांचे 
कानठळ्या बसणारे आवाज घुसळून 
नाचणारे तथाकथित भक्त  
बीभत्सपणें मिरवत असतात स्वतःला 
कोणास ठाऊक  कुठल्या नशेत
 साऱ्या जगाची झोप मोड करत 
झोपलेल्यांना जागे करत ताटकळत ठेवत आकाशात फटाक्याचा उजेड पाडत 
प्रचंड मोठे आवाज करत
निशब्दतेच्या सौंदर्यावर ओरखडे ओढत

लहान मुलांची रुग्णांची म्हातार्‍यांची 
पक्ष्यांची प्राण्यांची फिकीर न करता
ते असतात वाजत गाजत नाचत
प्रचंड ढोल ताशांचे ध्वनी उधळत
ते बाप्पाचे कधीच नसतात
ते  असतात फक्त स्वतःचे 
अप्पल पोटी दिखाव्याचे  
शत्रू समाजाचे निसर्गाचे आणि
इथल्या समृद्ध सखोल धर्माचे

पण त्यांच्याविरुद्ध बोलून 
चालणार नाही तुम्हाला 
तसे बोलला तर तुम्ही ठरता धर्मद्रोही
आणि देशद्रोही ही.
तुमच्या वक्तव्याची अन इथल्या गजराची
तुलना केली जाते पहाटेच्या भोंग्याशी
मग तर पुढचे बोलणेच खुंटते 

सौंदर्याला अभिजाताचे भावनेला भक्तीचे 
उधाणाला आनंदाचे सुराला मांगल्याचे 
रूप खरेच का देता येणार नाही?

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा ********* पुन्हा एकदा आकाश चांदण्यांनी भरून गेले  पुन्हा अनाम सुखाने मन बहरून गेले ॥ तेच स्थळ तीच भेट देहातील आवेग थ...