बुधवार, ११ सप्टेंबर, २०२४

गूढ वाट

गूढ वाट 
*******

उत्कट इच्छेने कधी पावले निघतात 
वाटा तुडवत जंगले ओलांडत
सत्याला शोधत गुरूला हुडकत 
जो नेऊन सोडेल तया ध्येयापर्यंत 

पण साऱ्यांच्या वाटा नाही पोहोचत 
साद देणाऱ्या हिमालया पर्यंत
काही अडकतात देवळात मठात 
संघात आखाड्यात चालणे विसरत

काही मिळालेल्या इवल्या कवड्यात 
सुख मानतात आणि पुन्हा निजतात 
त्यांचे बाहेर पडणेही खरेच असते श्रेष्ठ
क्षणिक जागे होणेही असते कौतुकास्पद

पण ज्यांच्या वाटा उमटतात डोळ्यात
तरंगतात मनात आणि उभ्या राहतात 
होणाऱ्या आरंभाशी झुगारून भीतीला
मिठी मारुनी स्वत:ला घनदाट एकांतात

अन् मग ती अडलेली कुठे बांधलेली 
अडखळून राहिलेली उगाच थांबलेली 
वाट उतरते खोलवर मेंदूच्या जंगलात 
जाते हृदयाच्या दरीत फिरते वादळागत 

साऱ्या अस्तित्वाचा पाचोळा करत 
जागृत जाणिवेच्या आरंभबिंदूपर्यंत 
शून्याच्या पोकळीत खोलवर घुसत 
सुरक्षिततेच्या साऱ्या कल्पना जाळत 

ती यात्रा अंतरयात्रा ते स्नान महास्नान
 ते दर्शन आत्मदर्शन येथे मग घडूनी
ती वाट पाहवी ज्यांची त्यांनीच डोळ्यांनी 
हे वाट ऐकावी ज्यांची त्यांनीच कांनानी

शोधणाऱ्याला ती वाट जातेच घेऊनी 
कधी भूल घालूनी कधी बळे ओढूनी 
म्हणून सांगतो त्या वाटेला कधी कुणी 
जाऊ नये कधी उगाचच कुतूहलानी 

गेल्यावर तिथून न घडते येणे परतूनी
आलच तर येणारा होतो दुसराच कुणी

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita.
☘☘☘☘ 🕉️ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा ********* पुन्हा एकदा आकाश चांदण्यांनी भरून गेले  पुन्हा अनाम सुखाने मन बहरून गेले ॥ तेच स्थळ तीच भेट देहातील आवेग थ...