बुधवार, ३१ मे, २०२३

ऋण

ऋण
*****
ते गाव डोळ्यातले आता विरून गेले 
ते नाव मनातले आता पुसून गेले ॥

ते स्पंद गात्रातले गात्री जिरून गेले 
ते छंद उरातले मौनी मुरून गेले ॥

जरी कुठे नच लिहले जगणे असेच असते 
मातीत सांडलेले प्रत्येक बीज का रुजते ॥

मी मागतो न कुणा सुख ओंजळ भरले 
मी वाटतो न कुणा दुःख मनात साठले ॥

सारेच देणे घेणे हे व्यवहार येथे असतो 
जो हसतो वा रडतो ऋणच फेडत असतो ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

सोमवार, २९ मे, २०२३

भजावे कुणा


भजावे ते कुणा 
*************
आम्ही तुजविण भजावे ते कुणा 
सांगाव्यात खुणा मनातल्या ॥१

हळूहळू केली होळी कामनांची
वेड्या हव्यासाची जागणाऱ्या ॥२

फक्त तुजसाठी दत्ता जगजेठी 
साहतोय बेडी जीवनाची ॥३

घेई रे व्यापून अवघे जीवन 
नुरावे स्मरण अन्य काही ॥४

विक्रांत त्रिगुणी जातसे बुडूनी
सोडव येवूनी अवधूता ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

रविवार, २८ मे, २०२३

ती

ती
***

तिचे निग्रही अधर
घट्ट एक एकावर 
चेहरा शांत कठोर
प्रतिक्रिया वा ना उत्तर  

डोळे ते  हिरमुसले 
हासु होते मावळले
कुणाही नच ठाऊक 
काय नेमके घडले

तिने सजावे मुक्त हसावे
होत पाखरू गीत गावे  
तम मिटावे दुःख हरावे 
प्रभू जीवन सुंदर व्हावे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

शनिवार, २७ मे, २०२३

गिरनार पायरी

गिरनार पायरी
************
होती मध्यरात्र गिळून सावल्या 
वृक्षवल्ली साऱ्या तम पांघरल्या ॥१
उभा समोरी तो महा गिरीराज 
आतुर पाऊले हृदयात गाज ॥२
नभी तारांगण धरूनिया फेर 
भेटली नव्याने होऊन आतुर ॥३
ऐकल्या वाचून दत्त दत्त ध्वनी 
उमटला मंद रंध्रा रंध्रातुनी ॥४
एक एक पायरी सांगू लागे कानी
किती झेलले ते धन्य स्पर्श त्यांनी ॥५
मग हजारदा घ्यावी कवळूनी 
एक एक पायरी वाटले या मनी ॥६
भारावल्या दिशा कुण्या लहरींनी
हरवल्या व्यथा गेलो सुखावूनी ॥७
गमे शिखर ते खुणेची पायरी 
पायरी पायरी चैतन्याच्या झरी ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘


पाठवले देवे


पाठवले देवे 
*********"
पाठवले देवे पुन्हा संसारात 
मायेच्या जगात जमविल्या ॥१
दावियली देवे तिथे तीच माया 
साधूचीया ठाया बसलेली ॥२
इथे या धनाचा चाले व्यवहार 
तिथेही व्यापार  तोची दिसे ॥३
धनावीन इथे जगतो ना कोणी 
आले रे कळुनी पुन्हा पुन्हा ॥४
बहुत दुस्तर तरण्या ही माया 
प्रभू दत्तात्रेया तुझी राया ॥५
विक्रांता या देवा कर नाथा सम
सुटो सारा भ्रम कांचनाचा ॥६
नच दिसो डोळा अंग कामिनीचे
रूप माऊलीचे तिथे वसो ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

बुधवार, २४ मे, २०२३

गिरनार मसाले

गिरनार मसाले
***********
फसलो ना आम्ही गिरनार दारी 
मसाल्याच्या हारी मांडलेल्या ॥१
माल तो स्वस्तात घेऊ गेलो छान 
मारले वजन कळले ना ॥२
वेलची न मिरी मोकळी लवंग 
गंधाळला हिंग मांडलेला ॥३
दगड फुलांचा रंग होता साचा 
धने नि जिऱ्याचा भाव चांग ॥४
दिसे बडीशेप हिरवी भरली
रंग जायफळी तापलेले ॥५
शुभ्र खसखस खोबऱ्या सोबत
करीत शर्यत होती जणू ॥६
केशरी जायत्री तमालाची पत्री
भलती साजरी मधोमध ॥ ७
पन्नास ग्रामनी दर पावशेरी 
जाहलेली चोरी कळली ना ॥ ८
आणिक तो खडा काळीया मिठाचा 
मारूनिया दडा बादयाफुली ॥ ९
परी घरी येता आणिक मोजता
कळू आली कथा फसल्याची ॥ १०
सांगण्या कारण असे अहो जन 
या हो परतून तुम्ही नीट ॥ ११
नका बळी पडू दोन बदामांना
गोड त्या बोलांना खेडवळ ॥१२
वाटले तर न्या वजन सोबत 
असता मोजत लक्ष ठेवा ॥१३
परि ती कशाला हवी उठाठेव
जपा फक्त भाव दत्त दत्त ॥१४
विक्रांत फसला मनात हसला 
देवे शिकवला धडा छान ॥१५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

मंगळवार, २३ मे, २०२३

मौनावली वाट

मौनावली वाट
**********"

जरी ओलांडून आलो शिखराला 
भेटे पायरीला दत्तराज ॥१
भेटला अंतरी हृदय मंदिरी 
जाणीव कुहरी वास केला ॥२
हरवला देह मन हरवले 
दत्ताकार झाले जग सारे ॥३
पहिली पायरी अंतिम असते 
व्यर्थ हे नसते संतवाक्य ॥४
आता कधी जाणे पहाड चढणे 
घडो येणे जाणे वा न घडो ॥५
उमटला ठसा पायरीचा आत 
गिरनार वाट मौनावली ॥६
विक्रांत घेऊनी घरी ये शिखर 
उजळे अंतर काठोकाठ ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

सोमवार, २२ मे, २०२३

चालणे

चालणे
******

काया न कष्टावी स्थिती न हरावी 
अंतरी पहावी दत्त मूर्ती ॥१

बसे दत्तात्रेय मेरुच्या शिखरी 
वाडी औदुंबरी त्याचं रिती ॥२

घडे तर घडो तेथे तुवा जाणे 
परी ते शिणणे आहे काही ॥३

घडावे भजन मनी दिन रात 
उजळावी वाट अंतरीची ॥४

बाकी धावाधाव कुण्या नशिबात 
प्रारब्धवशात असते रे ॥५

तर असा काही जाहला आदेश 
धावता आवेश थोपवला ॥६

विक्रांत हृदयी धरले साधन
तैसेच चालेन आता पथी ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

गुरुवार, १८ मे, २०२३

दता भेटायाला

दता भेटायाला
***********
पुन्हा भेटायला निघालो दत्ताला 
जीवीच्या जीवाला आपुलिया ॥१

तयाविना रिते काय आहे इथे 
महात्म्य परी ते स्थानाचे त्या ॥२

जिथे गेले संत महान ते भक्त 
श्रेष्ठ नवनाथ पुन्हा पुन्हा ॥३

तयाची ती शक्ती आहे तिथे किती 
कळत्या कळती विलक्षण ॥४

मळलेले मन तिथे हो पावन 
श्रध्देची वाढून येते वेल ॥५

गिरनारी नाथा करी कृपा आता 
परत मागुता धाडू नको ॥६

घेई सामावून माझे मन प्राण
नुरावा रे कण विक्रांत हा ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

बुधवार, १७ मे, २०२३

ज्ञानदेव -कृपेचे लाघव


ज्ञानदेव -कृपेचे लाघव
****************
भाग्याचा म्हणून रानी भटकता 
भेटे अवचिता चिंतामणी ॥१
तृष्णे लागी होतो बरडी धावत 
पातलो अमृत जल तिथे ॥२
फळले सुकृत भेटले दैवत 
हव्यासा सकट दैन्य गेले ॥३
आता मी चोखट  मिरवतो दाट 
प्रेम वहिवाट आळंदीची ॥४
मायबाप सखा माझा ज्ञानदेव 
कृपेचे लाघव ओघळले ॥५
जीवनाची माझ्या सारी फुले झाली 
पडून राहिली पायी तया ॥६
आता हा विक्रांत सुखे घनदाट 
तयाचा शब्दात नांदतो गा ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

मंगळवार, १६ मे, २०२३

तवंग


ओझे
*****
तनामनावर लादलेले ओझे 
कुठल्या जन्माचे कळेचिना ॥ १
ओझ्याखाली जीव होतो कासावीस 
सुख सारे ओस वाटतात ॥२
एक पेटलेली आग अंतरात 
जाळे दिनरात आतृप्तीची ॥३
मिळेल धनभोग म्हणे छान जग 
परि मी तवंग  पाण्यातला ॥ ४
वाहता वाहतो पाणीयाच्या वाटा 
पाणी नच होता येत मज ॥५
पुढे काय गती ठाव नसे स्थिती 
दत्ता तव चित्ती असे ते रे ॥६
जया सुरवात तया असे अंत
पाहतो विक्रांत उगा क्षोभ ॥७
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

रविवार, १४ मे, २०२३

असू दे


असू दे 
******
अजूनही ओढ तुझी मनातून जात नाही 
अजूनही रूप तुझे डोळे हे पुसत नाही ॥

जगते जरी मी इथे कशाला कळत नाही 
हे एकटेपण माझे आता पेलवत नाही ॥

येशील तू याची जरी मुळीच शक्यता नाही 
आशा पालवी आतली तरीही जळत नाही ॥

तू स्वप्न होते साजरे तू श्वास माझे आंधळे 
हरवले रंग तरी जाग येता येत नाही ॥

तू गीत माझे व्याकुळ तू भाव माझे आतुर
विसरले शब्द तरी धून जाता जात नाही ॥

ठरवले दारी तुझ्या मी कधी येणार नाही 
उरातील ओढ तुझी कश्याला बधत नाही ॥

जाणते मन जरी रे  हवे ते मिळत नाही 
असू दे जखमा उरी ज्या कधी भरत नाही ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

शनिवार, १३ मे, २०२३

दत्ता तुझी वाट

दत्ता तुझी वाट
***********

दत्ता तुझी वाट नाही सापडत
राहतो चुकत जीव सदा ॥१

दत्ता तुझी प्रीत नाही उगवत 
राही भटकत प्राण उगा ॥२

दत्ता तुझे रूप नाही रे दिसत
कळ काळजात उठे नित्य ॥३

दत्ता तुझे शब्द कानी ना पडत 
नाही उमटत नाभीकार ॥४

धिग जीणे माझे दत्ताविन वाया 
विक्रांतही काया सुटो आता ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

शुक्रवार, १२ मे, २०२३

नावेक भज


नावेक भज
*********

नावेक भज रे भज तू दत्त रे 
काढून चित्त रे 
संसारीचे ॥१
क्षण क्षण दत्त होतील मिनिट 
तेही घटीकात 
साठतील ॥२
होता आठवण दत्त व्यापी मन 
चैतन्य चांदणं 
अंतरात ॥३
सोस मागण्याचा वृथा जगण्याचा 
हरवेल साचा 
सहजीच ॥४
नाम नाम जोडी जप कर पोटी 
सुखाची विरुढी 
उगवेल ॥५
विक्रांत दत्ताला करी विनवणी 
अन्य आठवणी 
देऊ नको ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

बुधवार, १० मे, २०२३

मैत्रीचं झाड


मैत्रीचं झाड 
*********
तो माझा तरुण मित्र 
तावातावाने सांगत होता 
तिने मला चक्क ब्लॉक केलं 
आणि सांगते की पासवर्ड विसरला म्हणून.
मी काय एवढा मूर्ख आहे.
ते न समजायला

तेव्हा मी त्याला म्हटलं 
तर मग तू काय करू शकतोस.
तिच्या परवानगीशिवाय 
तिच्या वैयक्तिक जगात 
कसा काय प्रवेश करू शकतोस.

तो म्हणाला, 
नाही पण, मला कारण हवं होतं 
माहित व्हायला हव  होतं की
माझं काय चुकलं ?
त्यावर मी त्याला विचारलं
आणि समजा तुला ते कळलं 
आणि ते तुझ्या पचनी नाही पडलं 
तर तू काय करशील?

हममssssss
तो उद्गारला ,
पण त्याच्याकडे उत्तरच नव्हतं

मग मी त्याला सांगितलं ,
हे बघ ,कुणीतरी सहज आवडणं
आपण त्याच्याशी बोलणं 
कुठेतरी भावनिक रित्या गुंतणं
ही मानवी मनाची सवय आहे.
बऱ्याचदा गरजही असते.

पण हे लक्षात घे 
मनच मनाचं खेळणं असतं 
ते दुसऱ्याच्या मनाशी खेळतंय
असं वाटत असलं तरी 
ते स्वतःशीच खेळत असतं 

म्हणजे ते बोलणं चालणं गप्पा मारणं 
वाईट आहे असं नाही.
विशिष्ट मर्यादेपर्यंत ते ठीकही असतं 
पण कुठलीही मैत्री 
अपेक्षेच्या पारावर उभी असेल तर 
तिथे जमा होतात फुटकळ विचार
अपेक्षा, स्वामित्वाची जाणीव 
जमते हक्काची, विडी काडीची मैफिल .
होते निरर्थक धुराची घुसमट ॥

एकदा निरपेक्ष मैत्री करून बघ.
ती बोलतेय तोवर बोल.
तुला वेळ असेल तेव्हाच बोल.
कधी विचार व्यक्त होतील 
कधी मनोगत व्यक्त होईल 
कधी सुख दुःखाच्या गोष्टी उलगडतील 
कधी शुभेच्छा मिळतील 
कधी सल्ले विचारले जातील.

सगळ्यालाच नाही जमत 
तोंडावर स्पष्ट बोलायला 
डोळ्यासमोर काही सांगायला 
तेव्हा ते घेतात आधार 
या दूरस्थ माध्यमाचा .

अरे माझ्या तरुण मित्रा,
ती सुद्धा मैत्रीच असते 
कधी रुजते बहरते
कधी मरगळते कोमेजते 
कधी घाबरते टाळते 
कधी उन्मळूनही पडते.

म्हणून काय झालं.
मैत्रीच कुठलच रोप 
कधी वाया जात नसत
कुठलं रोप या जगाला 
क्षणभर हिरवाई देत
कुठलं रोप सुगंधी फुलं देतं 
क्वचित कुठलं रोप विशाल होतं 
फळांनी बहरून जातं 

कुठं कुणाचं काय होणार असतं 
ते आपल्या हातात नसतं 
आपण फक्त 
त्या रुजलेल्या अंकुरासारखं 
उगवणाऱ्या रोपासारखं 
फळणाऱ्या झाडासारखं 
निरपेक्ष व्हायचं असतं

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

सोमवार, ८ मे, २०२३

पानगळ .


पानगळ 
******
जीवनाचा एक अटळ अपरिहार्य हिस्सा असते पानगळ, 
जीवन वृक्षावरील समस्त सृजनाचे 
होणे विसर्जन आणि शेवटी 
तो जीवनाचा महावृक्षाचेही पडणे उन्मळून .
त्यालाही असणार अंत. 
अन जिथे अंत आहे तिथेच दिसते होतांना सुरुवात 

पृथ्वी आप तेज वायू आकाश
तीच तत्त्व घेतात पुन्: पुन्हा  आकार. 
खरंतर हरक्षणी 
पण भासतात दृश्यपणे कालांतराने 
अन् राहतात फिरत. 
मातीतून रोप रोपाचीच माती 
पानगळ असते त्याचीच छोटीशी आवृत्ती 

जीवाकडून घडवले जातात जीव 
वृक्षाकडून घडवले जातात वृक्ष 
आणि विश्वातून घडवले जाते विश्व 
पण शेवट ? तो माहीत नसतो कोणालाही
 डायनोसॉरचा अंत अपरिहार्य होता 
तसाच माणसाचा ही असणार का ? 
अर्थात ती फार लांबची गोष्ट आहे, 
सध्या तरी मला माझ्या अंताची चिंता केलेली बरी चिंता करूनही असं काय मोठं होणार ? 
जावं तर लागणारच, अंत तर होणारच, 
पानगळ तर ठरलेलीच. 

खरंतर मरायचे कुणालाही नसते ,
मलाही मरावसं वाटत नाही 
पण मला मरणाची भीतीही वाटत नाही. जीवनाचा स्वीकार मरणासकट केला आहे मी 
तेवढे चिंतन मनन तर केले आहे मी.
पण मला फक्त एकच चिंता आहे. 
एकच प्रश्न आहे .एकच गोष्ट जाणणे आहे 
की ही सारी पानगळीची जन्ममरणाची 
कटकट कुणी आणि का सुरू केली  ?
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

रविवार, ७ मे, २०२३

प्राजक्त

प्राजक्त 
********
देह कोवळे 
मन कोवळे 
फुल फुलले 
प्राजक्ताचे ॥

गंध कोवळा 
रंग कोवळा 
स्पर्श कोवळा 
प्राजक्ताचा ॥

बहर दाटला 
जगती भिनला 
जन्म कळला 
प्राजक्ताला ॥

कधी उमलले 
कधी ओघळले 
कुणा न  कळले 
प्राजक्त ते ॥

अलगद आले 
अलगद गेले 
स्वप्नच झाले 
प्राजक्त ते ॥

तुझ्या सारखा 
तू मजला कर 
ठस खोलवर
प्राजक्ता रे ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .


गुरुवार, ४ मे, २०२३

गायत्री चौधरी सिस्टरांना निरोप


एम.टी. अगरवाल रुग्णालयातील अनेक व्यक्ती मनात घर करून आहेत गुरव सिस्टर चंदने सिस्टर पाटील मॅडम भोत  वाघमारे साळी पिचड मनीष यादी तशी खूपच मोठी आहे त्यात आवर्जून नाव घ्यावे अशी आणखीन एक व्यक्ती म्हणजे गायत्री सिस्टर. गायत्री सिस्टर. त्या प्रमोशन होऊन भगवती /बीडीबीआय ला गेल्या .त्यामुळे निवृत्ती च्या वेळेला त्या तिथेच होत्या .त्यांना निवृत्तीच्या शुभेच्छा तशा देता आल्या नाहीत पण त्या शुभेच्छा मनात रेंगाळत होत्या, आज शब्दबद्ध झाल्या म्हणून देत आहे.

गायत्री सिस्टर
***********
एक उत्साहाचा झरा 
खळाळता वाहणारा
कलकल करत नाद 
आसमंत व्यापणारा
 म्हणजे गायत्री सिस्टर 

वाहता वाहता स्ववेगी 
दुःखाचा काटा कचरा 
सहज फेकत किनाऱ्याला 
सुखाला आनंदाला 
सदा मिठी देणारा
सर्वांना सुखावणारा 
ओघ म्हणजेच गायत्री सिस्टर 

उगमाला आरंभाला 
कडेलोट झाला तरी 
खोल डोही तळाशी 
सौख्य सूमने फुलवणारा
आनंदाचा ओलावा
म्हणजे गायत्री सिस्टर 

किती मित्र गोळा करावे 
किती जिवलग व्हावे 
जवळ येणाऱ्या प्रत्येकाला 
अमृत सिंचन करावे 
हे ज्याला कळले 
असा स्नेह 
म्हणजे गायत्री सिस्टर 

सदैव नितळ राहायचा 
हा तर धर्म या झऱ्याचा 
निर्मळता ओतून भवती 
स्वर्ग उभा करायचा 
स्वभाव गायत्री सिस्टरचा 

अश्या सुंदर झऱ्याची 
साथ संगत भेटली 
निरपेक्ष सहवासाची 
कलकल कानी पडली 
खरेच दुर्मिळ असती
झरे असे वाहती 
ज्यांच्या जीवनात येती
तिथे आनंद तुषार विखुरती
🙏🙏🙏
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

बुधवार, ३ मे, २०२३

ज्ञानदेवा

ज्ञानदेवा
*******
जाणल्या वाचून जाणतो तुजला 
कृपाळा दयाळा ज्ञानदेवा ॥१

पहिल्या वाचून पाहतो तुजला 
अंतरी साचला घनदाट ॥ २

भेटल्या वाचून भेटतो तुजला 
जीवीचा जिव्हाळा होतं उरी ॥३

काय सागराचे ठाव सागराला 
कण तो इवला कुठे आहे ॥४

अवघे व्यापून आकाश जगता 
ठाव नच रिता कुठे तया ॥५

तैसा तू असतो सदा माझे ठाई 
कृपेची बढाई काय सांगू ॥६

विक्रांत सुखात होवुनिया सुख 
पाहतो कौतुक आपलेच ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

मंगळवार, २ मे, २०२३

जिभेचे जिव्हार



जिभेचे जिव्हार
************
काय सांगू बाई जिभेचे जिव्हार
चवीला अपार लाचावले ॥१
पाहुनिया गोड तया ये उधाण
जातसे वाहून गोडीत त्या ॥ २
आमरस पुरी विविध त्या खिरी
अन् बासुंदीवरी ताव मारी ॥३
कुठेही पाहता भजी तळलेले
खातच सुटले अपार ते ॥४
आणि सोबतीला विविध ते वडे
पाहताच वेडे होत जाय ॥५
कधी आला ठेचा वाटा भरिताचा
तवंग तेलाचा लाल रंगी ॥६
तर मग काही विचारूच नका
खाये बकबका पाणी पीत ॥७
बरेच खारट थोडे कडवट
तयाला म्हणत  नाही कधी ॥८
लोणची पापड कारले कंटोली
स्वादही निराळी किती एक ॥९
जणू खाण्यासाठी जन्म हा झाला
त्याच त्या सुखाला हपापला . ॥१०
अगं हे पुराण संपणार नाही
पाने वही वही सरतील ॥११
वाढ लवकर पिठले भाकर
जीव तयावर जडलासे ॥१२
विक्रांत दरवळी झाला असे दंग
वास तो खमंग भाजलेला ॥१४
बाप गजानन देत असे खूण
हेच रे संपूर्ण परब्रम्ह ॥१५
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘☘ .

सोमवार, १ मे, २०२३

पैसा

पैसा
****

जर मी वेचला पैसा तो कुठला 
रस्त्यात पडला अनामिक ॥
तेणे मज होईल बहुत सायास 
चटके हातास बसतील ॥
तर मग घेऊ कैसे पापी धना 
पापाचा उगाणा पुण्या देवू ॥
दिसते या डोळा लोकामाथी पाप 
जन्माचे अमाप वाढलेले ॥
तया न कळते तया न दिसते
नरकाचे रस्ते विस्तारले ॥
देई गा श्रीदत्ता सर्वांना सुबुद्धी 
नुरावी कुबुद्धी कुठलीही ॥
आधी कळू यावे पाप घडणारे 
फेरे पडणारे जन्ममृत्यू ॥
विवेकाची फुटो पालवी मनात 
वळावे न हात पाप कर्मी ॥
सुख न धनात सुख न मानात 
सुख कामनात अरे नाही ॥
निर्मळ अंतर सुखाचे आगर 
वसे प्रभूवर नित्य तिथे ॥
विक्रांत पित्याचा असे सदा ऋणी 
दावीली वाहणी मज त्यांनी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...