सोमवार, ८ मे, २०२३

पानगळ .


पानगळ 
******
जीवनाचा एक अटळ अपरिहार्य हिस्सा असते पानगळ, 
जीवन वृक्षावरील समस्त सृजनाचे 
होणे विसर्जन आणि शेवटी 
तो जीवनाचा महावृक्षाचेही पडणे उन्मळून .
त्यालाही असणार अंत. 
अन जिथे अंत आहे तिथेच दिसते होतांना सुरुवात 

पृथ्वी आप तेज वायू आकाश
तीच तत्त्व घेतात पुन्: पुन्हा  आकार. 
खरंतर हरक्षणी 
पण भासतात दृश्यपणे कालांतराने 
अन् राहतात फिरत. 
मातीतून रोप रोपाचीच माती 
पानगळ असते त्याचीच छोटीशी आवृत्ती 

जीवाकडून घडवले जातात जीव 
वृक्षाकडून घडवले जातात वृक्ष 
आणि विश्वातून घडवले जाते विश्व 
पण शेवट ? तो माहीत नसतो कोणालाही
 डायनोसॉरचा अंत अपरिहार्य होता 
तसाच माणसाचा ही असणार का ? 
अर्थात ती फार लांबची गोष्ट आहे, 
सध्या तरी मला माझ्या अंताची चिंता केलेली बरी चिंता करूनही असं काय मोठं होणार ? 
जावं तर लागणारच, अंत तर होणारच, 
पानगळ तर ठरलेलीच. 

खरंतर मरायचे कुणालाही नसते ,
मलाही मरावसं वाटत नाही 
पण मला मरणाची भीतीही वाटत नाही. जीवनाचा स्वीकार मरणासकट केला आहे मी 
तेवढे चिंतन मनन तर केले आहे मी.
पण मला फक्त एकच चिंता आहे. 
एकच प्रश्न आहे .एकच गोष्ट जाणणे आहे 
की ही सारी पानगळीची जन्ममरणाची 
कटकट कुणी आणि का सुरू केली  ?
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुटू द्यावे

सुटू द्यावे ******* असते सदैव साथ का कुणाची  सुटतात हात सुटू द्यावे ॥ खेळ जीवनाचा पहायचा किती  मिटतात डोळे मिटू द्यावे ॥ हातात न...