बुधवार, २४ मे, २०२३

गिरनार मसाले

गिरनार मसाले
***********
फसलो ना आम्ही गिरनार दारी 
मसाल्याच्या हारी मांडलेल्या ॥१
माल तो स्वस्तात घेऊ गेलो छान 
मारले वजन कळले ना ॥२
वेलची न मिरी मोकळी लवंग 
गंधाळला हिंग मांडलेला ॥३
दगड फुलांचा रंग होता साचा 
धने नि जिऱ्याचा भाव चांग ॥४
दिसे बडीशेप हिरवी भरली
रंग जायफळी तापलेले ॥५
शुभ्र खसखस खोबऱ्या सोबत
करीत शर्यत होती जणू ॥६
केशरी जायत्री तमालाची पत्री
भलती साजरी मधोमध ॥ ७
पन्नास ग्रामनी दर पावशेरी 
जाहलेली चोरी कळली ना ॥ ८
आणिक तो खडा काळीया मिठाचा 
मारूनिया दडा बादयाफुली ॥ ९
परी घरी येता आणिक मोजता
कळू आली कथा फसल्याची ॥ १०
सांगण्या कारण असे अहो जन 
या हो परतून तुम्ही नीट ॥ ११
नका बळी पडू दोन बदामांना
गोड त्या बोलांना खेडवळ ॥१२
वाटले तर न्या वजन सोबत 
असता मोजत लक्ष ठेवा ॥१३
परि ती कशाला हवी उठाठेव
जपा फक्त भाव दत्त दत्त ॥१४
विक्रांत फसला मनात हसला 
देवे शिकवला धडा छान ॥१५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...