बुधवार, १० मे, २०२३

मैत्रीचं झाड


मैत्रीचं झाड 
*********
तो माझा तरुण मित्र 
तावातावाने सांगत होता 
तिने मला चक्क ब्लॉक केलं 
आणि सांगते की पासवर्ड विसरला म्हणून.
मी काय एवढा मूर्ख आहे.
ते न समजायला

तेव्हा मी त्याला म्हटलं 
तर मग तू काय करू शकतोस.
तिच्या परवानगीशिवाय 
तिच्या वैयक्तिक जगात 
कसा काय प्रवेश करू शकतोस.

तो म्हणाला, 
नाही पण, मला कारण हवं होतं 
माहित व्हायला हव  होतं की
माझं काय चुकलं ?
त्यावर मी त्याला विचारलं
आणि समजा तुला ते कळलं 
आणि ते तुझ्या पचनी नाही पडलं 
तर तू काय करशील?

हममssssss
तो उद्गारला ,
पण त्याच्याकडे उत्तरच नव्हतं

मग मी त्याला सांगितलं ,
हे बघ ,कुणीतरी सहज आवडणं
आपण त्याच्याशी बोलणं 
कुठेतरी भावनिक रित्या गुंतणं
ही मानवी मनाची सवय आहे.
बऱ्याचदा गरजही असते.

पण हे लक्षात घे 
मनच मनाचं खेळणं असतं 
ते दुसऱ्याच्या मनाशी खेळतंय
असं वाटत असलं तरी 
ते स्वतःशीच खेळत असतं 

म्हणजे ते बोलणं चालणं गप्पा मारणं 
वाईट आहे असं नाही.
विशिष्ट मर्यादेपर्यंत ते ठीकही असतं 
पण कुठलीही मैत्री 
अपेक्षेच्या पारावर उभी असेल तर 
तिथे जमा होतात फुटकळ विचार
अपेक्षा, स्वामित्वाची जाणीव 
जमते हक्काची, विडी काडीची मैफिल .
होते निरर्थक धुराची घुसमट ॥

एकदा निरपेक्ष मैत्री करून बघ.
ती बोलतेय तोवर बोल.
तुला वेळ असेल तेव्हाच बोल.
कधी विचार व्यक्त होतील 
कधी मनोगत व्यक्त होईल 
कधी सुख दुःखाच्या गोष्टी उलगडतील 
कधी शुभेच्छा मिळतील 
कधी सल्ले विचारले जातील.

सगळ्यालाच नाही जमत 
तोंडावर स्पष्ट बोलायला 
डोळ्यासमोर काही सांगायला 
तेव्हा ते घेतात आधार 
या दूरस्थ माध्यमाचा .

अरे माझ्या तरुण मित्रा,
ती सुद्धा मैत्रीच असते 
कधी रुजते बहरते
कधी मरगळते कोमेजते 
कधी घाबरते टाळते 
कधी उन्मळूनही पडते.

म्हणून काय झालं.
मैत्रीच कुठलच रोप 
कधी वाया जात नसत
कुठलं रोप या जगाला 
क्षणभर हिरवाई देत
कुठलं रोप सुगंधी फुलं देतं 
क्वचित कुठलं रोप विशाल होतं 
फळांनी बहरून जातं 

कुठं कुणाचं काय होणार असतं 
ते आपल्या हातात नसतं 
आपण फक्त 
त्या रुजलेल्या अंकुरासारखं 
उगवणाऱ्या रोपासारखं 
फळणाऱ्या झाडासारखं 
निरपेक्ष व्हायचं असतं

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लीला

लीला ***** आता थांबव रे सारी धावाधाव  मनातला गाव  वाहणारा ॥ सरू दे रे यत्न तया जाणण्याचे  जगी शोधण्याचे  उगाचच ॥ जाहली जुनाट पुस...