मंगळवार, २ मे, २०२३

जिभेचे जिव्हार



जिभेचे जिव्हार
************
काय सांगू बाई जिभेचे जिव्हार
चवीला अपार लाचावले ॥१
पाहुनिया गोड तया ये उधाण
जातसे वाहून गोडीत त्या ॥ २
आमरस पुरी विविध त्या खिरी
अन् बासुंदीवरी ताव मारी ॥३
कुठेही पाहता भजी तळलेले
खातच सुटले अपार ते ॥४
आणि सोबतीला विविध ते वडे
पाहताच वेडे होत जाय ॥५
कधी आला ठेचा वाटा भरिताचा
तवंग तेलाचा लाल रंगी ॥६
तर मग काही विचारूच नका
खाये बकबका पाणी पीत ॥७
बरेच खारट थोडे कडवट
तयाला म्हणत  नाही कधी ॥८
लोणची पापड कारले कंटोली
स्वादही निराळी किती एक ॥९
जणू खाण्यासाठी जन्म हा झाला
त्याच त्या सुखाला हपापला . ॥१०
अगं हे पुराण संपणार नाही
पाने वही वही सरतील ॥११
वाढ लवकर पिठले भाकर
जीव तयावर जडलासे ॥१२
विक्रांत दरवळी झाला असे दंग
वास तो खमंग भाजलेला ॥१४
बाप गजानन देत असे खूण
हेच रे संपूर्ण परब्रम्ह ॥१५
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘☘☘ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...