मंगळवार, ३१ जानेवारी, २०२३

संतसंग

 संत
****

झालास पतित वासनेत रत
 घडले अहित वेळोवेळा ॥

कृपाळू ते संत माऊली मनाचे
देतील दयेचे परि हात ॥

बाहेर काढती सुस्नान घालती 
आणि हाती देती नामकाठी ॥

कधी रागावती पोटाशी धरती 
हाती भरवती घास मुखी ॥

विश्वहितीरत तयांचे हृदय 
क्षमा अवयव जणू  काही॥

विक्रांत तयांची घेई पायधुळ 
सोयरे सकळ हेचि माझे॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘

सोमवार, ३० जानेवारी, २०२३

दास्य

दास्य
****

दत्ता तुझे दास्य हेच माझे काम 
इतर तो भ्रम कर्तव्याचा ॥

दत्ता तुझे नाम हीच माझी सेवा
उठाठेव देवा अन्य नको ॥

असो अधिकार सत्ता मातब्बरी 
परी ती चाकरी भिक्षेकरी ॥

काय भिकाऱ्यास असे त्यात तोष
साधन पोटास लाजेचे ते ॥

अहो देवाविन घडे जे जे काही 
व्यर्थ सारे पाही जगतात ॥

विक्रांत दास तो केवळ दत्ताचा 
वाही संसाराचा भार जरी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ 

रविवार, २९ जानेवारी, २०२३

एकांत

एकांत
*****

घडो घनदाट मनात एकांत 
तुझ्या स्मरणात दत्तात्रेया 

स्वरूपात बुडी देऊनिया चित्त 
राहू दे निवांत दयाघना

 तुच आत्मतत्त्वी तुच तू स्वरूपी
 चिदानंद रुपी सर्वाकार

 असु दे बाजूला चालला संसार 
जगाचा व्यापार सुखनैव 

जावे रानीवनी संसार सोडूनी 
मनाला घेऊनी कासया ते 

जगात राहुनी जग न होऊनी
 तुझ्यात मुरुनी राहो मन 

जाणतो विक्रांत हेच खरे तप
 रूपात अरूप पाहणे रे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘

शनिवार, २८ जानेवारी, २०२३

रेषा


रेषा ( उपक्रमासाठी)
***

कोण मारते कशास रेषा 
कधी कुणा कळत नाही 
कधी उमटती चित्रावली
कधी उमटती कविता ही

रंग बदलते शाई तेव्हा 
चित्रही किती वेगळे होते 
कुठले पेन कुठल्या हाती 
चिरकालीन ते नाते जुळते 

ती त्याच्यावर लिहिते फिरते 
सारे आयुष्य ओतून देते 
तिच्याच साठी मग तो उरतो 
तिच त्याची ओळख ठरते 

फाटत फाटत पान जाते 
परी तिची साथ न सुटते 
शाईचाच तो कागद किंवा 
कागदाचीच शाई असते 

कोरा दिसे कागद कुठला 
पण तरी तो कोरा नसतो
न दिसणाऱ्या तो रेषा देही 
खोलवरी जपत असतो 

अन शाई ती पेना मधली 
झरल्या वाचून कधी वाळते 
वाऱ्यावरती उडून गेल्या 
कागदाला स्मरत असते 

द्वैत त्या पाना रेषा मधले 
जेव्हा मिटते अक्षर होते 
अमृताच्या कल्लोळात मग
विश्व हे तरंगत असते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ 

शुक्रवार, २७ जानेवारी, २०२३

मर्जी


मर्जी 
****
दत्ता तुझी मर्जी म्हणून राबतो 
जगती जगतो प्रारब्धात ॥१

जैसे तू ठेवीसी राहील मी तैसा
 नाम मुद्रा ठसा लेवुनिया ॥२

राही प्रामाणिक कर्तव्य पाईक
 जरी अगतिक दलदली ॥३

फुकाचा तो पैसा उगविल पाप 
जाणूनिया माप पाहतो ना ॥४

दावली दुनिया पुरे दया घना 
तुझिया चरणा नेई आता ॥५

विक्रांत निवृत्ती लावुनिया डोळा 
जाण्या भक्त मेळा कासावीस ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ जाने

गुरुवार, २६ जानेवारी, २०२३

गणराय!!

गणराय
******

नागबंध ब्रहमसुत्र
पिंगलेस शुंडावक्र 
रिद्धीसिद्धी दोन्हीकडे 
डोईवर स्वर्ण छत्र ॥

मदमस्त गंडस्थळ 
रक्त वर्ण सतीबाळ
नयनात कृपा जळ
शोभती कर्ण विशाळ ॥
 
चतुर्भुज दिव्य मूर्त
पुष्प परशु हातात 
जपमाळ मोदकात 
सम दृष्टी समचित्त ॥

भक्तकाम रीपु र्‍हास 
ब्रीद शोभते जयास 
विघ्नहर गणराय
माझे नमन तयास ॥

देई बुद्धि सदाचार 
देई भक्ती अविकार 
पुण्य भारे पाप सार 
पदी विक्रांता स्वीकार ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ जाने










बुधवार, २५ जानेवारी, २०२३

सोंगटी

सोंगटी
*****

कालचा पडदा तुझा मखमली कापडाचा 
आज झाला आहे जणू  वज्रकाय पोलादाचा ॥

काल तुझी साथ होती क्षणोक्षणी संगतीला
आज जणू काळ मध्ये युगा युगांचा लोटला ॥

जगणे ते भाग आहे अर्थ जरी बदलला
सुखाचाच भास येथे खेळ उदास चालला॥

मी कशास सांगू कुणा दर्द माझ्या मनातला
आणि हाती खेळ देऊ जगास या खेळण्याला ॥

तुझे काय कसे काही विचारण्या अर्थ नाही
कोरडेच पात्र सारे बोललीस जरी काही ॥

भेटू नको पुन्हा कधी  दैवास आहे मागणे 
मिटून घेतो लोचने दिसताच मी चांदणे ॥

सरतील दिवस हे सारेच सरे शेवटी 
असे अमर वेदना जरी नवीन सोंगटी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ जाने





सोमवार, २३ जानेवारी, २०२३

घाव


घाव
***

एक घाव एक डाग मिटलाय मनातला
एक भाला उकलला उरामध्ये घुसलेला

अजूनही कुठे कुठे आहे शस्त्र रुतलेले
तन मन अजूनही वेदनेने व्यापलेले 
 
द्वेषाविना सहजच जगलोय आम्ही इथे
काम क्रोध जिंकताना हरलो कट्यारी पुढे

व्हावे आता नीट सारे मागे काही चुकलेले 
चुकणाऱ्या साथ घेत चालू मार्ग निवलेले

परी नको त्याच चुका तेच युद्ध हरलेले 
उंच उंच ध्वज राहो राष्ट्रगाणं स्वरातले 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ जाने




रविवार, २२ जानेवारी, २०२३

कळकळ

कळकळ
*******

एक कळकळ  हवीय केवळ 
तेणे तो धावेल चक्रपाणी ॥१

तया नको दान   यज्ञ पूजा घर 
शुद्ध ते अंतर जाणे फक्त ॥२

मांडली आरास  आणले जनास 
मांडावे धनास देवा सवे ॥३

येणे वाढे मान  व्यर्थ उपादान 
माझे मी पण पुष्ट झाले ॥४

चैतन्य कृपेने  विक्रांता कळले 
मन हे वळले अंतरात॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ जान २३

शनिवार, २१ जानेवारी, २०२३

राम भागीदार

 
राम भागीदार
***********

राम भागीदार माझिया धंद्याला 
मग रे तोट्याला वाव नाही 

साऱ्या भांडवला तयाची मालकी 
स्मरणात चुकी घडेचि ना 

होता व्यवहार जगती असार 
म्हणती संसार फोल जया 

तोच होय सार फायदा अपार 
जीवना आधार पूर्णपणे 

तयाला काळजी अवघ्या धंद्याची 
जणू जगण्याची भक्तांचिया

पडे पुण्य गाठी सांगती चैतन्य 
होताच अनन्य देवापायी

विक्रांते व्यापार केला केल्याविन 
हृदयी ठेवून हाच बोध

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘

गुरुवार, १९ जानेवारी, २०२३

फुटता फुटता

फुटता फुटता
**********
मी चांदण्याचे गुज तुजला 
सांगण्यास आलो होतो 
पाहून नभा मिठीत तुझ्या 
परतून पण गेलो होतो ॥१ ॥
भरवशावर ज्याचा मी 
किती युद्ध जिंकलो होतो 
ते शस्त्र मोडले दारी तुझ्या 
इमान द्यायला आलो होतो ॥ २॥
कितीदा तरी स्मृतीत तुझ्या 
चिंब चिंब भिजलो होतो 
ते आषाढाचे स्वप्न लाघवी 
पाहण्यास नच धजलो होतो॥३॥
नावही तुझे माहीत नव्हते 
दारावरून कितीदा गेलो होतो 
आणि कळता कधी अचानक 
हृदयी गोंदून बसलो होतो ॥४॥
ते गोंदनही किती काळ मग 
उगाच धरून जगलो होतो 
जीवनातून तू हरवून जाता 
मी जीवनावेगळा झालो होतो ॥५॥
घाव भरले अन व्रण उमटले 
जीवनात जरी रुळलो होतो 
फुटता फुटता कळे दिव्याला 
मी ज्योतीला  मुकलो होतो॥६॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘

सोमवार, १६ जानेवारी, २०२३

गोकुळ गावाला

गोकुळ गावाला
***********

किती पुरवतो लाड 
मी तो असुनिया द्वाड
किती घालतो मी घोळ 
तरी करीसी सांभाळ ॥
नाही मारत ठोकत 
नाही उपाशी ठेवत 
हळू सांगतो कानात 
चूक कळते मनात ॥
चार दिवस सरळ 
पुन्हा काढतोच कळ
कुणा फजित करून 
घेतो उगाच हसून ॥
कुणा दाखवतो भीती 
कधी चुकवतो रिती 
अशी खोडील ही वृत्ती
मज सोबत खेचती ॥
बहु  दटावतो मना
करी शास्त पुनःपुन्हा 
गाल फुगवून मज ते
सांगे गोकुळात होते ॥
खूप थकलो मनाला 
सांगे विनवून तुला 
बंदि गोकुळ गावाला 
कर तुझ्या या खट्याळा ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘

रविवार, १५ जानेवारी, २०२३

स्वामी छायेत


स्वामी छायेत
***********

दत्त पदी हे माझे जीवन 
स्वामी पदी म्या केले अर्पण ॥१
घेतो माझे मी  हे म्हणवून
माझे नुरले परि जीवन ॥२
अवधूताचा मार्ग धरला 
स्वामी छायेत जन्म चालला ॥३
आता मागू मी काय कुणाला 
कल्पवृक्ष तो मज भेटला ॥४
काय कळावे मजला स्वामी 
सागर तीरी मुंगी जणू मी ॥५
परि दीनाचा तोच दयाळू 
करितो माझा प्रेमे सांभाळू ॥६
तोच धरतो तोच सोडतो 
हरवू जाता खेचून घेतो ॥७
किती वाणावे तया कृपेला 
श्रीगुरुदास सुखी जाहला ॥८
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘


शुक्रवार, १३ जानेवारी, २०२३

अव्याहत

(फोटो साभार आसावरीताई)

अव्याहत
*********

कुठे जीव अडतो 
कुठे सल रुततो
तरी जन्म चालतो 
अव्याहत ॥

कुठे बीज अंकुरते 
कुठे माती सुखावते 
कुण्या राती हरवते 
अचानक  ॥

बीज कोणी पेरले 
रोप कोणी चोरले
कोणा नच कळले 
शोधशोधून ॥

दोन दिवसाचे 
गाणे उन्मेषाचे 
होते स्वप्न साचे 
पण काही रे ॥

हिरव्या सुखानी 
सजते अवनी
येतसे रुजूनी
पुनःपुन्हा ॥ 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘

बुधवार, ११ जानेवारी, २०२३

दत्त लहरी


दत्त लहरी
**********
मोहाच्या कर्दमी दत्त बुडवतो 
आणिक हसतो मोठ्याने रे ॥

अपकीर्ती धूळ दत्त उडवतो 
आणि रडवतो पुन्हा पुन्हा ॥

प्रतिमा फोडतो चित्र उलटतो 
नकोसे करतो जगतात ॥

आणिक थांबता बाहेरी धावणे 
येऊन प्रेमाने कुरवाळतो ॥

देतो उघडून प्रज्ञेचे विभव 
भक्तीचे लाघव लाडक्यांना ॥

विक्रांता कळल्या दत्ताच्या लहरी 
कोंडून अंतरी धरीला रे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘




मंगळवार, १० जानेवारी, २०२३

गणेश जन्म रुपकावर आलेल्या प्रश्न रुपी प्रतिक्रियेचे विश्लेषण

गणेश
*****
मागे मी गणेश जन्मावर  रुपक स्वरुपात एक छोटसे लिखाण केले  होते. त्याच्यावर आलेल्या प्रश्न रुपी प्रतिक्रियेचे विश्लेषण करायचा प्रयत्न करत आहे

प्रतिक्रिया :-
  but Dr. Tikone's  analogy  theory   implies  the following :

 1.Ganapatibappa is non existent  and only a mere  idea.?

2. Parvatimata is an ignoramus , and  also as  adamant, like  other mortal women. 
A virtous, pious ,resolute , spiritually accomplished woman who did penance for thousands of years to seek Lord Shiva , as her soul mate can be  so foolish ?

3. The Hindus who worship Ganpatibappa have been living in a fools paradise all along??

Please explain.
१.
एकच गोष्ट वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिली असता वेगळी दिसते .एकाच वस्तूवर विविध काळी पडणाऱ्या सूर्यकिरणांचे परावर्तन त्या वस्तूला वेगळे रूप देतात. तीच वस्तू सकाळपासून संध्याकाळपर्यंत दृष्टीला गोचर होत असते सूर्यास्तानंतर अंधार पडल्यावर ती काळोखा मध्ये हरवून जात असते, जरी ती तिथे असते. 
त्याचप्रमाणे मानवी दृष्टी ,मानवी ज्ञान यांना स्थळ आणि काळाच्या मर्यादा आहेत . ज्यास आपण भौतिक ज्ञान म्हणतो ते आणि आध्यात्मिक ज्ञान हे  वेगळे असते. याशिवाय ज्ञान आणि विज्ञानाच्या पलीकडे जाऊन चे जाणले जाते ज्याला दृष्टीचा डोळा पाहू शकत नाही असे जे जाणणे काही  ते हि वेगळेच असते .

या सगळ्यामध्ये सूक्ष्मतेने पाहिले असता
असे लक्षात येते कि आपण एका दृष्टिकोनातून, देव हि सगुण संकल्पना मानून साधन  करतो तसेच दुसरे काही त्याला निराकार कल्पून त्याचे साधन भजन करतात 

थोडक्यात भक्त, ज्ञानी आणि योगी हे त्या एकाच गणेशाला वेगवेगळ्या रूपात पाहतात .मी देव मानत नाही असे म्हणणारे सुद्धा त्या "नाहीचे" अस्तित्व मानत असतात . अन त्या नास्तिकतेच्या महाशुन्यातून बुद्धत्वाचा जन्म होत असतो.
२.
महन्मंगला जगतमाता भगवती पार्वती ही इतर किंवा कुठल्याही  साधारण स्त्री सारखी अडेल अज्ञानी असणे कसे शक्य आहे ? पण परमेश्वरी लीले मध्ये, महामायेच्या खेळामध्ये ती माया तसे रूप घेऊ शकते ती शिवाची शक्ती आणि शिष्या म्हणून जेव्हा उतरते तेव्हा ती अज्ञानाचे आवरणही स्वेच्छेने घेत असते हे लक्षात घेणे आवश्यक आहे. कारण तिने तसे रूप घेतले नाही तर या  जगात ज्ञानाचे अवतरण कसे होईल ? तर त्या असीम करूणेने अपार प्रेमाने ती अज्ञान पांघरून शिष्यत्व स्वीकारत असते 
३.
गणेशाची उपासना करणारे हिंदू हे मुर्खांच्या नंदनवनात फिरणारे रिकामटेकडे नाहीत, कारण हिंदू धर्मातील देवता त्या भक्तांसमोर प्रकट झालेल्या आहेत.  किंबहुना इतर धर्मामध्ये सुद्धा त्या त्या धर्मातील देवता सत्पुरुष किंवा प्रेषित त्यांच्या भक्त समोर प्रकट झालेले आहेत .त्याचे  काही मानसशास्त्रीय विश्लेषण असू शकते परंतु त्याची अत्यंत सत्य अनुभूती ही भक्ताला मिळत असते. कदाचित ते आंतरशक्तीचे प्रतिध्वनीरुपही असू शकते किंवा अंतर मनातील  ऊर्जा संघटित होऊन आपल्या मनातील  देवतेचे प्रतिबिंब त्यास दिसत असेलही म्हणून गजाननाच्या भक्ताला गजाननाचा साक्षात्कार होणे सहाजिकच आहे हिंदू धर्मामध्ये साधनेचे सगुण पूजेचे सगुण उपासनेचे एक अतिशय फार मोठे शास्त्र आहे त्यामध्ये मानसशास्त्राचा फार मोठा विचार केलेला आहे .ज्या कोणाला त्यात जायचं आहे पडायचं आहे त्यासाठी एक अद्भुत आणि कधीही न संपणार परंतु मनमोहून टाकणारे अरण्य आहे .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


सोमवार, ९ जानेवारी, २०२३

स्वामी अंतरात


स्वामी अंतरात
************
आज पावसात आलो रे भिजून 
स्वामींना पाहून अंतरात ॥१
पाहिली ती मूर्त नच पाहियली 
मनी ठसलेली आपसूक ॥२
ऐकले बोलणे कानी न पडले 
मधाळ कोवळे हळुवार ॥३
जाहले उघडे मन दडलेले 
दिगंबर भोळे बाळापरी ॥४
घेतला प्रसाद हळूच हातात 
टाकला मुखात आनंदाने ॥५
अन वाचली ती नित्य ज्ञानेश्वरी 
शब्द कृपा करी निवडक ॥६
तरारले तृण गेलेले वाळून 
तार झंकारून आली सोहं ॥७
पाहियले ऐसे स्वप्न जागेपणी
विक्रांते रंगुनि चरित्रात  ॥८ 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘

Don't hold

Don't hold
*********

If a bird is flying away
from your hand .
let it go.
if a sand is falling away 
from your fingers 
let it go.

every attempt to hold 
will hurt you
every attemt to catch 
will pain you .

Why one should depend
for happiness 
why one should beg 
for kindness 

Let the life flow like water 
with its speed 
Let the life grow like woods 
without greed 

When one hold things 
with force 
it looses its charm 
when one insist for 
possesssion 
there is no warmth 

 let him go away
or let her go away
this is the best way 
to live happily without sway.

🌾🌾🌾© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘

शनिवार, ७ जानेवारी, २०२३

राधिकेची माय

राधिकेची माय
***********

ती तिची वाट जरी एकटीची 
सवे तिच्या परी मुर्त राधिकेची ॥
शामला कोमला सुखाची पुतळी 
डोळियात सौख्य स्नेह भरलेली ॥
राधिका मनाची घेऊन बासरी 
जरी का सारते  केशवास दूरी ॥
जाणतो कृष्ण तो पेलतच नाही 
सांभाळणे पिस जमतच नाही ॥
सोडला तिने तो मग अट्टाहास 
वाहिले स्वतःला राधेच्या रूपास॥
ती अन तिची ती राधा अवखळ 
कृष्ण उरे मग निळुले आभाळ॥
राधिकेची माय राधिकाच होय 
हरवे विरह तीच पूर्ण होय ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..

गुरुवार, ५ जानेवारी, २०२३

शीला पाटील सिस्टर ( श्रद्धांजली)

शीला पाटील सिस्टर ( श्रद्धांजली)
****************
तिला माहित नसेलही हे कदाचित 
सात्विकता होती ती जग पाजळीत ॥
यायची घेऊन सौम्य चांदणे सवेत
अन व्हायचे सारे जग प्रकाशित ॥
ती बोलायची मोजके जरी ना मित 
सभोवार उमटायचे  मंगल संगीत ॥
तिच्या हसण्याची एक मोहक रीत 
कानात गुंजायाचे शब्दा विना गीत ॥
फुले वेदनांची जरी की ओंजळीत 
नव्हतीच कटुता शब्द देह बोलीत ॥
ती शांत समयी जणू की देवघरात 
जरी रोष तडकून येई कधी वातीत ॥
ती आई शोधणारी प्रिय पाडसास 
तिचे डोळे तसेच करुणा हंबरीत ॥
ती गेली आता मागण्यास न्याय देवा 
संपली मेणमुर्त आज कोरली मेणात ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..

बुधवार, ४ जानेवारी, २०२३

शहर

शहर
*****

तेच चार स्वीकार तेच चार नकार 
जीवनाचा आकार  लोळागोळा ॥

त्याच चार वाटा त्याच चार खाटा 
देहाचा भोगवटा ठरलेला ॥

तीच सकाळ देही तीच संध्याकाळीही 
जीवनाची वही कोरी कोरी ॥

तीच काळी नजर तेच जुने जहर 
तेच धूर्त शहर विखारी रे ॥

अंता वाचून अंत तरी काळ अनंत
ठेचलेली खंत पार पूर्वीच ॥

साचले शब्द सारे विझले शब्द सारे 
आकाशीचे तारे अशनी झाले ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..


सोमवार, २ जानेवारी, २०२३

कैवारी


कैवारी
******
दीनांचा कैवारी म्हणती तुज रे 
देतो भक्ती त्वरे भक्ता लागी ॥१

वेगळे ते काय मागतोय मी ही 
देत का रे नाही दत्तात्रेया ॥२

देई म्हणतो मी वैराग्याची छाटी
ज्ञानाच्या पावुटी चालवी रे ॥

घेई रे जवळी नाम दे मुखात 
तुझ्या प्रेमात भिजू दे ना ॥

काय कधी खोटे प्रेम ते असते 
जीव जे देते जीवासाठी ॥

घेऊनिया प्राण विक्रांत हातात
तुझ्या दारात उभा आहे ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ ..

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...