शनिवार, २८ जानेवारी, २०२३

रेषा


रेषा ( उपक्रमासाठी)
***

कोण मारते कशास रेषा 
कधी कुणा कळत नाही 
कधी उमटती चित्रावली
कधी उमटती कविता ही

रंग बदलते शाई तेव्हा 
चित्रही किती वेगळे होते 
कुठले पेन कुठल्या हाती 
चिरकालीन ते नाते जुळते 

ती त्याच्यावर लिहिते फिरते 
सारे आयुष्य ओतून देते 
तिच्याच साठी मग तो उरतो 
तिच त्याची ओळख ठरते 

फाटत फाटत पान जाते 
परी तिची साथ न सुटते 
शाईचाच तो कागद किंवा 
कागदाचीच शाई असते 

कोरा दिसे कागद कुठला 
पण तरी तो कोरा नसतो
न दिसणाऱ्या तो रेषा देही 
खोलवरी जपत असतो 

अन शाई ती पेना मधली 
झरल्या वाचून कधी वाळते 
वाऱ्यावरती उडून गेल्या 
कागदाला स्मरत असते 

द्वैत त्या पाना रेषा मधले 
जेव्हा मिटते अक्षर होते 
अमृताच्या कल्लोळात मग
विश्व हे तरंगत असते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘☘☘☘ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...