गुरुवार, १९ जानेवारी, २०२३

फुटता फुटता

फुटता फुटता
**********
मी चांदण्याचे गुज तुजला 
सांगण्यास आलो होतो 
पाहून नभा मिठीत तुझ्या 
परतून पण गेलो होतो ॥१ ॥
भरवशावर ज्याचा मी 
किती युद्ध जिंकलो होतो 
ते शस्त्र मोडले दारी तुझ्या 
इमान द्यायला आलो होतो ॥ २॥
कितीदा तरी स्मृतीत तुझ्या 
चिंब चिंब भिजलो होतो 
ते आषाढाचे स्वप्न लाघवी 
पाहण्यास नच धजलो होतो॥३॥
नावही तुझे माहीत नव्हते 
दारावरून कितीदा गेलो होतो 
आणि कळता कधी अचानक 
हृदयी गोंदून बसलो होतो ॥४॥
ते गोंदनही किती काळ मग 
उगाच धरून जगलो होतो 
जीवनातून तू हरवून जाता 
मी जीवनावेगळा झालो होतो ॥५॥
घाव भरले अन व्रण उमटले 
जीवनात जरी रुळलो होतो 
फुटता फुटता कळे दिव्याला 
मी ज्योतीला  मुकलो होतो॥६॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे https://kavitesathikavita.blogspot.com ☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...