मंगळवार, ३० मे, २०१७

जिंकावे मरण

जिंकावे मरण
***********

वाजतो नगारा
काळाचा दणाणा
परंतु कळेना
कुण्या काना ||

मरती माणसे
जळती रोजला
चिंता न कुणाला 
पाहण्याची ||

अहाहा सुंदर
चढलीय झिंग
मनाचे तरंग
भोगामध्ये ||

जिंकावे मरण
मरणाच्या आधी
सुटावी ही व्याधी
जन्माची रे ||

म्हणुनी व्याकूळ
त्यास वेडपट
म्हणती भित्रट
जग सारे ||

विक्रांत बिहाला
शरणार्थी झाला 
तयास भेटला
दत्त सखा  ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


सोमवार, २९ मे, २०१७

प्रतीक्षा




तुझ्या प्रतीक्षेचे ओझे 
घेऊन थांबलो आहे 
येशील तू कधीतरी 
श्वासात उरलो आहे 

अस्तित्वाचा प्रश्न उगा 
घेऊनी शिणलो आहे  
तो तुझा स्पर्श होण्यास
बहू आतुरलो आहे 

स्मृती विभ्रमात मन
चिंबसा भिजलो आहे 
किती लोटली युगे मी
कालौघी बुडलो आहे

येशील ना आतातरी 
माझ्यात मिटलो आहे
ओठावरी जुने गाणे 
घेऊनी सजलो आहे 

तुझ्यास्तव रंग नवे 
मी आकाश झालो आहे 
जगण्याचे स्वप्न उरी
घेऊनी बसलो आहे


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


शनिवार, २७ मे, २०१७

तो आणि ती




    https://youtu.be/7tUuFIEdoDk



ती...

ती नाचत होती
त्याच तिच्या शैलीत
विलक्षण सहजतेने
दिलखेचक पदन्यासात
अजिंठ्याच्या शिल्पागत

ते तिचे चिरकालीन यौवन
तिच्या मुद्रा तिचे हावभाव
आणि त्यातून साकारणार गाणं
सारे भरून उरले होते मंचावर
मधली सारी सारी वर्ष जणू
भास होता घडणारा पडद्यावर


तो

तो गर्दीतील प्रेक्षागृहात
एकटक नजरेने नृत्य पाहत
त्या दृश्यात पूर्णतः हरवलेला
किंवा कुठल्यातरी
वेगळ्याच क्षणात पोहचलेला

त्या क्षणी तिचे अस्तित्व
जणू तोच झाला होता
कदाचित निरपेक्ष त्रयस्थ
गंभीर अथांग दिसत होता
पण  तरीही पुनवेच्या सागरागत
पुन्हा भरून आला होता


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in



Inspired by above video

शुक्रवार, २६ मे, २०१७

किती आळवू रे..


किती आळवू रे..
*************

किती आळवू रे
तुला दत्तराया
विरह हृदया
साहवेना ||

वाहते जीवन
कारणावाचून
करावे जागून
काय आता ||

दावतोस स्वप्न
हाती आल्याविन
जाळी रात्रंदिन 
कारे मज ||

कधी भेटशील
काय भेटशील
डोळा दावशील
रूप तुझे ||

खरी काही खोटी
असे माझी भक्ती
परी तुझी कीर्ती
आहे थोर ||

विक्रांत मागतो
पुनःपुन्हा देवा
पदी ठाव द्यावा
मज आता ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


बुधवार, २४ मे, २०१७

पुरे आहे मजला




ते तुझे असणेच इथे बस पुरे आहे मजला 
उगा चांदण्यात बसणे बस पुरे आहे मजला

थकुनिया सांजवेळी येता कधी तव वाटेला
ते तुझे हलकेच स्मित बस पुरे आहे मजला

तुला नको ताजमहाल अन मज रासलीला
गंध क्षण दरवळला बस पुरे आहे मजला

बोलतो न जरी काही तरी तू जाणते मजला   
ते तुझे कळणे सहज बस पुरे आहे मजला

सुख दु:खे तुझी माझी भिडली नाहीत आभाळा
तरीही त्यात तू सोबतीस बस पुरे आहे मजला
                                             
सात जन्म असो नसो कुणी पाहीला काळ फेरा
जन्म हा भरून पावला बस पुरे आहे मजला

भेटलो नकळे कसा मी कसा जाणे सांभाळला
सदा तुझा ऋणी राहणे बस पुरे आहे मजला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


मंगळवार, २३ मे, २०१७

आर्तीचे व्याकुळ


आर्तीचे व्याकुळ
तुवा सांभाळले
देहासी रक्षिले
कौतुकाने ।।

प्रेमासी विकला
रंग रूपा आला
योग क्षेमी झाला
मायबाप ।।

पोटा दिले अन्न
निवाऱ्यास छत
झाला सदोदित
पाठीराखा ।।

जाणतो मी दत्ता
माथी तुझा हात
संकटात साथ
अहर्निशी ।।

आता फक्त कर
एकची ती कृपा
कोंदाटल्या रूपा
दावी मज ।।

सदा राहो तुझी
मज आठवण
स्वरूप स्फुरण
क्षणो क्षणी ।।

विक्रांत आर्त ना 
जिज्ञासू फारसा
प्रेमाची पिपासा
परी आत  ।।

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in 



रविवार, २१ मे, २०१७

जगत पसारा




कशाला मांडला
जगत पसारा   
जीवाला उदारा
चैन नाही ||

दु:खाच्या आगीत
जळती पाखरे
मनाचे निखारे
होती इथे ||

सुखाच्या कुशीत
कुणी मुठभर
त्यांचीही अंतर
काजळली ||

तरीही संपेना
सुखाची अपेक्षा
घुटमळे आशा
इंद्रियात ||

विक्रांत सांडेना
दु:ख साचलेले 
निरर्थ वेचले
हवेपण ||

कर कृपा अशी
दत्ता दयाघना
कळू दे जीवना
जगणे हे

एक आस तुझी
मज अवधूता
सांभाळशी भक्ता
हरवल्या  ||


डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे





बुधवार, १७ मे, २०१७

रिक्तता..




रिक्तता..
********

पुन्हा आली तीच
दाटून शून्यता
घेरून जीवना
जाणवे रिक्तता

विझलेले मन
थकलेले तन
सोडण्या जगास
व्याकुळ प्राण

उथळ जगाची
पोकळ वाहणी
पाहून लागते
जीवास टोचणी

कोंडले जीवन
पाच दशकात
दिन सरतात
व्यर्थ अंधारात

कुणासाठी इथे
जगावे कशाला
वठून चालला
वृक्ष हा थोरला

मिटल्या वरती
अवघी विस्मृती
सुख दुःखा सवे
विवश जागृती

अंधारी अंधार
भरला  सरला
आला अन गेला
कुणाला कळला

विक्रांत बुडाडा
वाढला चढला
भ्रमित पोकळी
घेऊन जगाला

हाती न वाढणं
हाती न फुटण
निरर्थ अस्तित्व
निरर्थ जगणं


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...