मंगळवार, ५ जानेवारी, २०१६

वेदनांचे काळकुट





जीवनाचे ओझे झाले
सुखस्वप्ने वाहतांना
पाऊलांचे गाणे गेले
कुणाविना चालतांना

आपुलेच आक्रंदन
परतून येई काना
आणि कंठी शोष पडे
पाणी पाणी म्हणतांना

मृगजळ भेटतात
स्वप्न नवी पडतात
परी हात लावताच
स्पर्श पुन्हा जळतात

पातकांचा भर माथी
शाप कुण्या जन्माचा हा
जगतांना तडफडे
अरे जन्म कशाला हा

चाललेल्या वाटेवर
चटकेच सोसतांना
कसे खरे मानू सांग    
या जगाच्या वल्गनांना

मी न माझा आता इथे
प्रीती यारी सारी झूठ
विषाची आभा भोवती
वेदनांचे काळकुट

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...