मंगळवार, ३० जून, २०१५

वादळ होती ती...




स्वतःत धुमसणारी आग होती ती
दिशा हरवले बेभान वादळ होती ती

आघात झालेली नागीण होती ती
समोर कुणीतरी वेगळीच होती ती

धार धार शब्दांचे करीत तीक्ष्ण वार
बेगुमान लढणारी हाराकिरी होती ती

नाही जमले तिज सांभाळले काहीही
सुटलेल्या प्रत्यंचेतील बाण होती ती

गर्व म्हणावा का हा अथवा मानी वृती
मांडलेला डाव पुन्हा मोडीत होती ती

होवुनी उभा जड एक पाषाण मूर्ती मी   
घेवूनी घण प्रतिमा छिन्न करीत होती ती

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


सोमवार, २९ जून, २०१५

देवा यतिवरा



 



आलो इथवर | जैसा तैसा देवा |
नच दूर जावा | पुन्हा आता ||१ ||
नको पुनरपी | घालूस विरही |
प्रभू मागतो ही | भिक तुज ||२ ||
ठावूक मजला | आहेस अंतरी |
का न कळे तरी | भय वाटे ||३||
काय मिळविले |असावे मी तुला |
काय ते मजला | शक्य असे ||४ ||
तुझीच करुणा || उदारा दातारा |
देवा यतिवरा | गुरुदत्ता ||५ ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


  

रविवार, २८ जून, २०१५

वर्षा स्वप्न





रिमझिमता पावूस दारात 
वाऱ्यासवे होता उधाणत
एका अनामिक ओढ वेडी  
दाटून आली माझ्या मनात
सळसळत्या पोचोळ्यात
पावूल कुणाचे ऐकू यावे
चिंब भिजून स्वप्न माझे
अन सामोरी उभे ठाकावे
मग पाण्याचा डंख झेलीत
मी ही एक झाड व्हावे 
त्या विजेला मिठीत घेत
जन्म जाणीव हरवून जावे  
फक्त नाद तो कोसळण्याचा 
नि स्पर्श कोवळा जगण्याचा
शब्दावाचून या देहा सांडून 
 कागद व्हावे मी होडीचा   
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

स्वामी नित्यानंद




स्वामी नित्यानंद | समाधी दर्शन |
घेवूनीया मन | आनंदले ||१||
तयाच्या कृपेची | जगास प्रचिती |
माझ्या मनी दीप्ती | प्रकाशली ||२||
जयास भेटला |सावळा तो कृष्ण |
आहेत ती धन्य | नरनारी ||३||             
तयाच्या मंदिरी | शांती समाधान |
पातले हे मन | न मागता ||४||
भेटे ज्ञानदेव | भेटे दत्त राज |
ऐसे मज आज | वाटले ते ||५||
गुरुशक्ती एक | कळो आले गुज |
ओघळे सहज | कृपा आत ||६||
इथेच पंढरी | नि अलंकापुरी |
कळले अंतरी | आपोआप ||७||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




पुन्हा एकदा

पुन्हा एकदा ********* पुन्हा एकदा आकाश चांदण्यांनी भरून गेले  पुन्हा अनाम सुखाने मन बहरून गेले ॥ तेच स्थळ तीच भेट देहातील आवेग थ...