गाव नदीची आसरा
काळा डोह सांभाळते
पोर बुडुनीया मरे
पूजा जोरात चालते
मेल्या पोराच्या आईचे
दु:ख डोहात जिरते
काळ्या उदास डोहाचे
भय सांजेला डसते
कुणी ऐकतो रातीला
गाणी अवेळी कातर
चाळ छुमछुमणारे
नदी किनारी वावर
छाया दिसते कुणाला
म्लान उदास बैसली
वाऱ्यावरती हलती
काळ्या ढगांची सावली