शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१३

माणूस अजूनही जिवंत होता






दुखणारे पाय
अवघडला खांदा
कोपऱ्यात मी
दूर लोकलचा
दरवाजा होता
शंभर लोकांनी
अडविला रस्ता
जणू कडेकोट
तट होता
उतरायचे स्टेशन
जवळ जवळ
येत होते 
गर्दीचा कवच
अधिकाधिक
आवळत होते 
धक्के बसणार
मान दुखणार
सारे काही
पक्के होते
खूप वर्षांनी
आलो तरीही
इथले नियम 
माहित होते
घेतली बँग
गळा टाकली
दरवाज्याकडे
कूच केली 
आणि एक
नवल घडले
माझ्या पिकल्या
पांढऱ्या केसांनी
थकल्या भागल्या
वृद्ध चेहऱ्यानी
काहीतरी किमया
केली होती
माणसे वाट
देत होती
कठोर भिंत
वितळत होती
थोडा असा
थोडा तसा
होत होतो
थोडा ओढून
थोडा ढकलून
पुढे पुढे
जात होतो
आणि शेवटी
चक्क मी
दार गाठता
झालो होतो
त्रास झाला
होणार होता
धक्का बसला
बसणार होता
परंतु तरीही
गर्दी मधला
मज सांभाळणारा
वाट देणारा
माणूस अजूनही
जिवंत होता


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ठसा

ठसा **** जया प्रकाशाची हाव   ज्याचे आकाशाचे गाव  त्याचे दत्तात्रेय ठाव  ठरलेले ॥१ जया कळते बंधन  जरा जन्माचे कारण  तया दत्ताचे स...