गुरुवार, ३१ जुलै, २०२५

साधने

साधन 
******
भजता भजता भजन हरावे 
स्पंदन उरावे भजनाचे ॥१
स्मरता स्मरता स्मरण नुरावे 
एकटे उरावे शून्यामाजी ॥२
नाचता नाचता नर्तन ठाकावे 
तद्रूपची व्हावे झंकाराशी ॥३
लिहता लिहता लिहणे थांबावे 
अर्थ उमटावे कैवल्याचे ॥४
गाता गातांना रे गायन थांबावे 
श्वासात उरावे सूर फक्त ॥५
ऐसिया अवघ्या कृतींचा शेवट 
ईश्वरा निकट थबकावा ॥६
तर ती साधने प्रीतीची भक्तीची 
देवाच्या प्राप्तीची खरोखर ॥७
अन्यथा बाजारी मिळतेच मोल 
परी ते रे फोल सर्वार्थाने ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, ३० जुलै, २०२५

दत्त भेटी लागी

दत्त भेटी लागी
************
दत्त भेटी लागी दत्त होणे पडे 
मोडूनिया वेढे कामनांचे ॥

आम्हा हवा दत्त कामात भोगात 
धनसंपत्तीत जगतांना ॥

तर मग दत्त होय दिवा स्वप्न 
लोभी मरे मन लोभातच ॥

सरावे म्हणून लोभ न सरती 
काम क्रोध घेती वेटाळून ॥

वैराग्यावाचून घडेना साधन 
विवेकावाचून मार्ग नाही ॥ 

म्हणूनिया आधी मागावे ते दान 
भक्तीला जोडून दयाघना ॥

तरीच ती काही इथे असे आशा
अंतरीची दिशा पाहण्याची ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, २९ जुलै, २०२५

मन आवरेना


मन आवरेना
**********
विचाराचे मन मनची विचार
सातत्य आधार मागतसे ॥१
गुंतवते मन हरेक वस्तूत 
सुखात दु:खात सदोदित ॥२
मन पाहू जाता हाती न लागते 
गुंडाळून घेते पाहणाऱ्या ॥३
मनापलीकडे सत्य दडलेले 
शब्दी कळू आले तरी काय ॥४
मनाची पकड मुळी न सुटते 
चक्र हे फिरते गतिमान ॥५
मन रामनामी संत समागमी
स्वरूपाचे धामी रमेचिना ॥६
मनाला रंजन हाच एक ध्यास 
विवेकाची कास धरवेना ॥७
बापा अवधुता मन आवरेना 
संसार सुटेना म्हणून हा ॥८
तुझाची आधार मजला केवळ 
धरून सरळ नेई पदा ॥९

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, २८ जुलै, २०२५

गाठ

गाठ
*****
दत्त राम कृष्ण एकच चैतन्य 
नाव आन आन जरी त्यांची ॥

शारदा कालिका लक्ष्मी रूप छान 
पदी होता लीन शांती लाभ ॥

परि देव देवी वरती भक्ताला 
लावती भक्तीला निज ठाई ॥

जयाचे आराध्य तया तेथे गती 
अन्यथा पडती येरझारी ॥

म्हणूनिया मना स्मर त्या रूपाला 
ठेवी हृदयाला तेच एक ॥

कळता कळते खूण ही मिळते 
मनात बसते गाठ घट्ट ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, २७ जुलै, २०२५

चाकरमानी

चाकरमानी
********
पोटाला पाठीला 
पिशव्या बांधुनी
कामाला निघती
हे चाकरमानी ॥

चाकरमान्याच्या 
डोळ्यात घड्याळ
देहा चिकटली 
लोकलची वेळ ॥

चाकरमान्याचे 
दिवस सातच 
वर्षाचा हिशोब 
नसतो कुठेच ॥

उजाडे दिवस 
मावळे दिवस
कळल्या वाचून 
सरतो दिवस ॥

बाकीच्या कामात
सरे रविवार
सरता सरता 
येई सोमवार ॥

परत पिशव्या 
डबे ते तयात 
पायाची भिंगरी 
धावते फलाट ॥

अन् कधीतरी 
थांब सांगे वय 
काय करू आता 
तया वाटे भय ॥

धावलो आपण 
जगलो आपण 
आयुष्य गर्दीत 
हरवले पण . ॥

चालले हे यंत्र 
थांबले हे यंत्र 
कळल्या वाचून
जगण्याचे तंत्र ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, २६ जुलै, २०२५

श्रावण २ विरह

श्रावणा २ (विरह)
*******
कशाला श्रावणा येशी माझ्या दारा 
घेऊनीया धुंद ऊन पाणी वारा 
तुजला पाहता आठवते कुणी 
 एकटे पणाची खंत ये दाटूनी
तेच अवखळ सरी सम येणे 
सोनेरी उन्हाचे मोहक हसणे 
कधी बोलावणे कधी पिटाळणे 
हिरव्या स्पर्शाने मन मोहवणे 
घडे लपंडाव ऊन सावलीचा 
विकल मनात  पुराण स्मृतींचा 
होतो मंत्रमुग्ध तुज पाहतांना 
परी भंगे तंद्रा हा एकटेपणा
येईन का कधी वाट ती शोधत 
ओढाळ पायांनी ओढच ती होत 
काय बहरेन पुन्हा तो प्राजक्त 
वेचता येईन सुमन एकेक 
तर मी श्रावणा तुजलागी मिठी 
देवुनिया घट्ट ठेवीन रे दिठी

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

श्रावण१ (प्रेमकविता)

 
 
 
श्रावण १( प्रेमकविता)
*******
येई रे श्रावणा येई माझ्या दारा 
घेऊनिया धुंद ऊन पाणी वारा 
तुजला पाहता आठवते कुणी 
इंद्रधनु पुन्हा उमटते मनी 
तेच अवखळ सरी सम येणे 
सोनेरी उन्हाचे मोहक हसणे 
कधी बोलावणे कधी पिटाळणे 
हिरव्या स्पर्शाने मन मोहवणे 
घडे लपंडाव ऊन सावलीचा 
हर्षित मनात स्मृती लाघवाचा 
होतो मंत्रमुग्ध तुज पाहतांना 
स्वप्न जागेपणी दिसते डोळ्यांना 
येईन वाटते मज ती शोधत 
ओढाळ पायांनी निर्झरची होत 
मग बहरेन पुन्हा तो प्राजक्त 
वेचून घेईन सुमन एकेक 
देईन श्रावणा तुजलागी मिठी 
भिजुनिया चिंब ठेवीन रे दिठी
*****
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

स्वामीभेट

स्वामी भेटी ******** कृपेचे कोवळे चांदणे पडले  स्वामी भेटी आले  अकस्मात  नसे घरदार नसे ध्यानीमनी  भाग्य उठावणी  केली काही  तोच स...