शुक्रवार, ३१ जानेवारी, २०२५

डॉ .हेमा साळवे ( निवृत्ती दिना निमित्त )

डॉ .हेमा साळवे ( निवृत्ती दिना निमित्त )
************
फार कमी लोक असतात 
ज्यांना ठाऊक असते कि
 त्यांना कसे जगायचे ते 
जीवनाच्या हिंदोळ्यावर होऊन स्वार 
येणाऱ्या सुखद वाऱ्याचा 
झोत झेलत चेहऱ्यावर 
पोटात उठणाऱ्या श्वास रोधक 
गोळ्याचा अनुभवत थरार 
कधी उंच उंच फांदीला स्पर्श करत 
कधी मातीवर पायाला हलकेच घासत 
तशी मला डॉक्टर हेमा साळवे वाटते

झोपाळ्यावर करावा लागतो बॅलन्स
सावरावा लागतो स्वतःचा 
अन झोपाळ्याचा तोल 
तसा संसार आणि नोकरीचा तोल सावरत 
सुख टीपत पाखरांना सांभाळत 
भिंतींना सावरत आकाशात भरारत
जगणाऱ्या मुंबईतील लाखो भगिनींचे
ती मूर्तीमंत प्रतीक आहे .

हे सारे जीवन तिने 
आनंदाने साजरे करत जगले 
येणाऱ्या साऱ्या प्रसंगांना 
डोळे उघडे ठेवून सामोरे जात पाहिले 
कदाचित ते तिला तिच्या स्वभावातील 
 संवेदनशीलता मोकळेपणा निर्भीडपणा स्पष्टवक्तेपणा त्यामुळे तिला सहज जमले 

दुःखाचे डोह शोधून 
त्यात मन गुंतवून बसणे 
अन गंभीरतेच्या अवकाशात 
जगण्याचे कारण शोधणे 
हे तिने कधी केले असेल 
असे मला वाटत नाही 
ती मैत्रीचे झरे जवळ करत 
खळखळणाऱ्या प्रवाहात 
स्वतःला झोकून देणारी
त्यात नर्तन करणारी 
निर्मळ प्रसन्न जलपरी आहे 
असेच मला सदैव वाटते .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, ३० जानेवारी, २०२५

कुंभमेळा व बळी

कुंभमेळा व  बळी
*****************
कुठलाही धर्म कुठलेही कर्मकांड 
जीवाहून मोठे नसते.
पण नीट पाहिले तर कळते 
प्रत्येक श्रध्दा ही अंध श्रद्धाच असते.
ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे 
संस्कारा प्रमाणे ती आकार घेते.
ज्या श्रध्देने देश धर्म समाज 
आणि व्यक्तीचे अहित होते 
ती त्यागणे श्रेयस्करच.
हे एक सत्य आहे की 
इथे व्यवस्थापन अपुरे पडले.
पण कोट्यवधी लोकांना सांभाळणे 
तेवढे सोपे नसते
प्रत्येक यात्रेत जत्रेत 
अफाट गर्दी होत असते
त्यात मध्ये चेंगराचेंगरी 
होण्याची शक्यता असते
जिवलग हरवण्याची शक्यता असते .
तरीसुद्धा या जत्रांची गर्दी कमी होत नाही 
याचे काय कारण एकच असते
देहामनापर नेणारे क्षितिज 
त्यांना तिथे खुणावत असते .
अस्तित्वाचे नग्न सत्य भूल घालत असते.
त्यांच्यासाठी ते स्वप्न 
जीवावर उदार व्हावे एवढे अफाट असते.
चेंगराचेंगरी मध्ये मरण तर कुठेही येत असते 
ते दादरच्या परळच्या पुलावर येत असते 
आणि कुंभमेळ्यातही येत असते 
पण ते शेवटी एका अपघाताचे फलित असते 
तिथे श्रद्धा अंधश्रद्धचे नाते नसते.
🌾🌾🌾
 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 

बुधवार, २९ जानेवारी, २०२५

कारण

 कारण
*******
प्रीतीच्या कवणा प्रीतीचा अंकुर 
फुटल्या विना न येतो रे बहर ॥

अन्यथा विझतो हरेक निखारा 
राखेचा आणिक उरतो ढिगारा ॥

भक्तीच्या कवणा भावना तरंग 
मिळताच येती भक्तीला रे रंग ॥

अन्यथा पाखंड कोरडा वेदांत 
जीवना वाचून वठलेले झाड ॥

शौर्याच्या कवणा देशाभिमान 
यावच लागतो मनात दाटून ॥

अन्यथा निरस पगारी कविता 
जन्मास येते रे नसलेला आत्मा ॥

विक्रांत जगणे जीवना कारण 
कळल्या वाचून अवघे सरण ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, २८ जानेवारी, २०२५

किती वेळा

किती वेळा
********
किती वेळा तुझ्या दारी पुन्हा पुन्हा मी रे यावे 
एकदाही तुज का रे न वाटे मज भेटावे ? ॥१

काय करू हृदय हे तुझ्या पदी अंथरले 
बजावते मन किती परी तया ठोकरले ॥२

याद तुझी आली नाही दिस असा गेला नाही 
मोह माझा घनीभूत तुला सोडवत नाही ॥३

सारे काही सोडूनिया जाईल मी देशोधडी 
तुझी स्मृती ठेवीन रे करूनिया खोल घडी ॥४

येऊ नये तुझ्याकडे पाहू नये तुझ्याकडे 
गोळा पुन्हा करू नये काळजाचे हे तुकडे ॥५

ठरविले लाख वेळा जमले न एक वेळा 
धाव घेती तुझ्याकडे प्राण डोळा होत गोळा ॥६

एक वेळ यावयाला तुज काय धाड पडे ?
जळतो मी अंतरात अन् तुझा खेळ घडे ॥७

जाळूनिया छळुनिया काय सुखी होशील तू 
दुर्लक्षून मज असे मजेत का राहशील तू ? ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ -

  1. दादा गावंड यांची कविता (अनुवाद) edited 
    *******************
    मन हे भटकते तया भटकू दे 
    राहुनिया शांत तया पाहून घे ॥१

    बाहेर धावून करी ते व्याकूळ   
    परी स्तब्ध रहा अंतरी निश्चळ ॥२

    राहू वाहू दे हे मन नि विचार 
    व्यस्त सदोदित आणीक अपार  ॥३

    जाणीव निश्चल अलिप्त नि शांत 
    आपुलिया आत सदा अखंडित ॥४

    सौर्य मंडलास सदैव भ्रमण 
    सूर्य  परी राही ढळल्या वाचून ॥५

    धावू दे इंद्रिय इंद्रियाच्या अर्थी 
    होवो कासावीस मन मेटाकुटी ॥६

    परंतु ती ऊर्जा असू दे अलिप्त 
    धावू देत मन निरखी त्या शांत ॥७

    फुटतात लाटा अनंत वरती 
    अंतरी सागरा गांभीर्य नि शांती ॥८

    भटकती मेघ सर्व जगतात 
    परी आकाश ते पवित्र निस्तब्ध ॥९

    घटती घटना घडो जीवनात 
    राही अंतरी तू सावध निवांत ॥१०

    बडबडे मन सदैव बेशिस्त 
    ठेव आकलन शांत मी दुरस्थ ॥११

    प्रखर प्रदग्ध पाहणे घडता  
    शांती व नम्रता उलगडे चित्ता ॥१२

    अरे तू आकाश असीम अनंत 
    नच पसरले मेघ अस्ताव्यस्त ॥१३

    सावध सुधीर संवेदनशील 
    आहेस तू साक्षी तुच जाणशील ॥१४

    क्षणिक स्मृती नि क्षणिक विचार 
    नाहीस रे तू जाण हे साचार ॥१५

    सखोल गंभीर प्रचंड सागर 
    तरंग ना तू जो दिसे वरवर ॥१६

    असेअविचल सूर्य तू महान 
    नच उपग्रह विचार भ्रमण ॥१७

    तूच तूच आत शाश्वत नि स्थिर 
    विनाशी ढसाळ दिसे जै बाहेर ॥१८

    अनंत अव्याप्त असा जो शाश्वत 
    अजन्मा प्राचीन असा तू रे फक्त ॥१९

    तत तत्व असी तूच असे तो रे 
    तत तत्व असी तूच असे तो रे ॥२०

    तुझ्यातील ते हे सदा तुझे व्हावे 
    जाणीवी जाणीव सारे उजळावे ॥२१

    कालाच्या अतीत दिव्य अनुभूती 
    अक्षय अवीट यावी तुझे हाती ॥२२

    मूल्यवान अशी घटिका ही आहे 
    मूल्यवान क्षण आताचाच आहे ॥२३

    करी हे चिंतन धरी रे तू ध्यान 
    घेई तू जाणून आपल्या आपण ॥२४

    दिव्य ते आपले अंतर जाणून 
    शाश्वत नित्य घे स्वरूप पाहून ॥२५

    🌾🌾🌾
    © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
    https://kavitesathikavita.blogspot.com  
  2. स्तब्ध रहा तू रे निष्चल 

सोमवार, २७ जानेवारी, २०२५

असणे


असणे
*****
माझ्या असण्याचे गाणे 
जेव्हा होईल नसणे 
तेव्हा घडेल गवसणे
दत्तात्रेया  तुझे  ॥

जैसे सदा सर्वकाळ
व्यापुनिया आभाळ 
राहते ते सलील 
दिसल्याविना  ॥

सदा असून नसणे 
सदा नसून असणे 
अगा असे हे खेळणे 
तुझे कौतुकाचे ॥

हा असा नाहीपणा
'नाही  उर्मीच्या विना 
माझ्या उरावा अंगणा
जाणीवेच्या   ॥

गूढ जरी मी जाणतो
तव  वर्म समजतो
सारे तुच रे करतो
सर्वातीता ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ -

रविवार, २६ जानेवारी, २०२५

माझ्या अंगणात

अंगणात
********
माझ्या देवघरी सगुण खेळणी 
ठेवली मांडूनी एक एक ॥ १

लंगडा श्रीकृष्ण वाघावरी आईं 
उपदेश देई दत्तात्रेय ॥ २

गोड गणपती देव पशुपती 
देवी सरस्वती सुंदरशी ॥३

रामकृष्ण स्वामी ज्ञानदेव साई 
नर्मदा गंगाई श्रीनाथजी ॥ ४

राम पंचायन  ठेवले मांडून 
सवे .गजानन  शेगावीचा ॥ ५

खेळता खेळता भरले अंगण
भरेना ग मन काय करू ॥ ६

घराच्या आतून माय बोलावते 
जावे न वाटते परी आत ॥ ७

याद देई सांज सरू आला खेळ 
कुशीत त्या वेळ शिरण्याची । ८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ -

अटळ

अटळ **** गिरनारी मूर्ती फुटली गोरक्षाची  ती कृती भ्याड नामर्द रात्रीची  अफगाणी मूर्ती फुटली गौतमाची  ती कृती उद्दाम  द्वाड दिवसा...