रविवार, ३० जून, २०२४

देहाचे आकाश

देहाचे आकाश
************
दत्ताचिया पदी वाहूनिया भक्ती 
पातलो निश्चिती आता रे मी 
जहाला शेवट अवघ्या यत्नांचा 
काही करण्याचा आव नाही 
ठेवील तो जैसा तैसा मी राहीन 
कृपेची लेईन वस्त्रे सदा 
असो संसाराचा दारी ताप वारा 
आपदांच्या धारा अविरत
देह जगणारा जगू देहात 
संकल्प मनात नसलेला 
दत्त बोलविता दत्त चालविता 
कर्ता करविता दत्त व्हावा
विक्रांत जगाचा सुटो कारावास 
देहाचे आकाश दत्त व्हावे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .

ज्ञानदेवी

ज्ञानदेवी
*******
शब्दा शब्दातून ओघळते कृपा 
ज्ञानदेव रूपा कान पाही ॥१
कैवल्याचे शब्द शब्दची कैवल्य 
होतो मनोलय ऐकतांना ॥२
उरते स्पंदन एकतारी मन 
सुखे कणकण आंदोलीत ॥३
 शब्दांचे लावण्य अद्भुत अपार 
ज्ञाना अंतपार लागतो ना ॥४
किती किती वाणू ग्रंथ ज्ञानदेवी 
अनावर होई वाचा माझी ॥५
मराठी होऊन जो न ग्रंथ वाचे 
फाटक्या भाग्याचे दरिद्री ते ॥६
विक्रांता भेटला ग्रंथ महामेरू 
कृपेचा सागरू ज्ञानदेव ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, २९ जून, २०२४

आशीष

 आशीष
*****

तिची गाणी त्याच्यासाठी 
त्याला कळणार नाही 
पांघरला जीव देही
कुणा दिसणार नाही ॥

वेल सखी वृक्षासाठी 
मिठी सुटणार नाही 
वादळाचे भय मनी 
साथ तुटणार नाही ॥

वृक्षावरी लोभ गाढ
वेल सोडणार नाही 
कोसळेल देह परि
प्रीत हरणार नाही ॥

असते रे प्रीत अशी 
कुणा कळणार नाही 
काळजाची आस वाया 
कधीच जाणार नाही ॥

आषाढाचा ऋतु जरी 
आभाळात हरवतो
सुखावल्या वेलीवरी
सान  फुल फुलवतो ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ .


 .

प्रदीप पुजारी

प्रदीप पुजारी 
*********"
नितळ प्रसन्न पाण्याचा झरा आहे 
प्रदीप पुजारी 
सदैव हसमुख आणि प्रसन्न मनाचा 
अजातशत्रू चतूर पापभिरू प्रसंगावधनी 
प्रामाणिक आणि कष्टाळू 
खरंतर तो म तु . अगरवालचा
 इनसायक्लोपीडिया आहे
 इथली प्रत्येक व्यक्ती चांगली की वाईट 
बरी की वाया गेलेली आळशी की बिनकामाची 
 कष्टाळू की  किमानदार 
त्याचा अंदाज न चुकणारा 
त्याचा सल्ला सदैव उपयोगी पडणारा 
त्याचे बोलणे सदैव नम्र मृदू मवाळ 
नैसर्गिक मधाळ 
त्याची विनंती धुडकावणे तर
ब्रह्मदेवालाही जमणार नाही 
त्याला काळ वेळ माणसे प्रसंगाची 
अचूक माहिती असूनही ,
आतील व बाहेरील ज्ञान असूनही 
त्याचे प्रदर्शन ते करीत नसत
**१
गेल्या 25 वर्षातील रुग्णालयातील
साऱ्या महत्त्वाच्या घटना त्यांना माहित आहेत 
त्याचे कारणे माहित आहेत 
त्याचे व निकाल व तोडगे त्यांना माहित आहेत  
पुढे येऊ घालणारे कॉमप्लिकेशनही माहित आहेत
 इथे प्रत्येकाला प्रदीप हा आपला 
आपल्या गोटातला माणूस वाटतो 
प्रत्येक प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्याला 
प्रदीप उजवा हात वाटतो 
तो त्यांची सारी गुपित मनात ठेवायचा 
किंबहुना प्रत्येक प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्याचा
तो हनुमान होता तो विदुर होता इसाप होता 
चाणक्य होता आणि कृष्णही होता 
समोरचा सीएमओ कसाही असो 
अगदी धृतराष्ट्र असला तरीही 
तो त्याच्या हिताच्या गोष्टी त्यांना सांगायचा 
ते सांगताना तो इसाप नीतीचे धडेही द्यायला 
कारण त्याला माणसाच्या चांगल्या व वाईट
 दोन्ही गोष्टी माहित असायच्या 
साम-दाम भेट दंड या 
जगातील रिती पक्केपणी ज्ञात होत्या 
आणि  कुणी ऐकत नसेल तर ते सोडूनही देणारा
मनात न ठेवणारा वाईट वाटून न घेणारा 
तटस्थता हा गुण ही त्याच्यात आहे 
**२
तसा प्रदीप पक्का बैठकीतला
 समर्थांचा आकाश हृदयात बांधून घेतलेला 
ओंजळीत जमलेले ते आकाश 
कौतुकाने मिरवणारा दुसऱ्याला दाखवणारा 
आणि वाटणारा ही
त्याचे ते इवलालेसे सत्संग मन प्रसन्न करून 
टाकणारे थंडगार वायूच्या झुळूकीगत .
सारं काही  विसरवणारे 
खरंतर 72 नंबर आणि प्रदीप यांचे नाते 
म्हणजे म्यान आणि तलवारीचे होते 
टाळ आणि मृदुंगाचे होते 
फाईल व पेपरचे होते 

प्रमुख वैद्यकीय अधिकारी येत होते जात होते 
पण बहात्तर नंबरच्या खुर्चीशी
प्रदीपचे इमान चिरस्थायी होते 
अगरवाल मधील सर्वांचा लाडक्या 
आवडत्या माणसासाठी जर मतदान केले 
तर प्रदीप त्यात पहिला नंबर येईल 
या त मला मुळीच शंका नाही 
**३
आता प्रदीप रिटायर होतोय
अर्थात ते खरे वाटत नाही 
पण त्याची ती शीडशीडत चपळ 
लगबगीने जाणारी हातात फायलीपी 
पिशवी सांभाळणारी अशी मूर्ती 
आपल्याला रोज ड्युटीवर दिसणार नाही 
पण त्यांनी लावलेल्या लळा आपुलकी प्रेम 
हे अबाधित राहील 
ते प्रेम त्यांना इकडे बोलावीत राहील 
आणि आपली भेट घडत राहीन 
यात संशय नाही 
या जुळलेल्या मैत्रीच्या प्रेमाच्या स्नेहाच्या
तारा झंकारत राहो 
तसेच त्यांना निवृत्तीनंतर सुख समाधान 
आनंद राहो त्यांची प्रकृती आरोग्य राहो 
त्यांच्या समर्थांच्या बैठकी रंगत राहो 
हीच प्रार्थना
**४
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, २७ जून, २०२४

पूनम साखरकर

पूनम साखरकर सिस्टर 
************
1.फार कमी व्यक्तींचे नाव तिच्या व्यक्तिमत्त्वाला समर्पक असते . पण ते किती असावे ? त्यात थोडाफार फरक असतोच पण पुनम सिस्टर यांचे पूनम साखरकर हे नाव त्यांच्या व्यक्तिमत्वाशी 100%  अनुरूप आहे .
पूनम सिस्टराचे वागणे जगणे पौर्णिमेच्या चंद्रासारखे शीतल आहे . तिचे बोलणे लाघवी मधूर आहे . जिचे पाहणेही हसरे व निर्व्याज आहे नम्रता शांतता तिच्याकडे मुक्कामालाच आले आहेत 
त्यांचे काम एकदम परफेक्ट असते . ते काम कधीही बळेच केलेले नसते वेळ काढू पणे केलेले नसते .अगदी मनापासून जीव ओतून ते काम झालेले असते . अगदी आखिव रेखीव आणि याबद्दल त्यांना थोडाही गर्व झालेला दिसत नसे .
त्यांचे अगोदरच नाव काटकर तेही चांगलंच पण देवाने विचार केला असावा की त्यांना अजून चांगले , अनुरूप नाव द्यावे , म्हणून मग त्यांची गाठ पडली साखरकराशी . खर तर हे साखरकरांचेच भाग्य आहे .साखरेतील मधुरता शुभ्रता हवेपणा त्यांच्यामध्ये एकवटलेला आहे . 
*1
2 बाकी पूनम सिस्टर चे माझ्यावर फार ऋण आहेत मी व्ही शांताराम आरोग्य केंद्रामध्ये ज्या वेळेला एफटीएमओ होतो त्यावेळची ही गोष्टी आहे . मला त्या पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी या कामाचा फारच कंटाळा आला होता .
खरंतर त्यावेळी मी नुकताच डॉक्टर झालेलो  ज्ञानाने भरललो रुग्णसेवेला आतुरलेला तरुण होतो आणि  मला ती आकडेमोड करणे मस्टर पहाणे रिपोर्ट करणे असली कागदी कामे आवडत नव्हती
त्यावेळेला पूनम सिस्टरांनी ते ओझे इतके सहजपणे उचलले  की मला त्याकडे पाहावेच लागले नाही मग मी क्लिनिकल कामांमध्ये रमून गेलो अन्यथा मी महानगरपालिकेला तेव्हाच राम राम ठोकला असता .
 खरंच संगतो अडीच वर्षासाठी देवाने मला एक ॲडिशनल बहिण दिली होती . त्याकाळी मला कडकडीत एकादशीच्या उपवासाचे वेड लागले होते आणि मग दुपारी मला हापो ग्लायसेमिया व्हायचा माझा चेहरा उतरायचा पण मी ठामपणे खायचं टाळायचो मग सिस्टर  काय करायच्या मला न सांगता हळूच एनर्जीची बाटली मागवायच्या आणि उघडून माझ्या समोर ठेवायच्या आणि मग माझा कडकडीत उपवास मवाळ होवून जायचा .
**2
3 माझा चेहरा तरतरीत व्हायचा . त्या त्यांच्या प्रेमाने आग्रहाने  माझ्या रक्तात पुन्हा साखर खेळू लागायची .साखरकराचे साखरकर नाव सार्थ व्हायचे
असे दोन-तीन वेळा झाले मग मी उपास करायचे सोडून दिले
 त्यांचे आपल्या आईवर फार प्रेम होते की आईची त्यांच्यावर फार प्रेम होते मला माहित नाही पण गांधी रुग्णालयाच्या तुटलेल्या भिंतीवरून त्यांचा डबा देणारी ती प्रेमळ आई माझ्या मनचक्षूवर  कायमची कोरली गेलेली आहे .
आपल्या सर्व सहकाऱ्यांना सांभाळून घ्यायची त्यांची हातोटी ही विलक्षण आहे कदाचित मला जो काही थोडेफार स्टाफ सांभाळता येऊ लागला ते त्यांच्याकडे पाहूनच ,असे मला वाटते .
       नंतर  मला प्रमोशन मिळाले व मी हेल्थ पोस्ट सोडले पुढील तीस वर्षात पुनम सिस्टराला क्वचितच भेटलो पण विसरलो मात्र कधीच नाही कारण ज्या व्यक्ती आपल्याला आवडतात त्या सदैव आपल्या हृदयात राहतात
 जेव्हा जेव्हा सहकारी स्टाफचा विषय निघत असे तेव्हा मी न चुकता पुनम सिस्टराचे नाव घेत असे 
*3
4 सी वाज द बेस्ट .अँड सी इज द बेस्ट
असे मला नेहमीच वाटते .असं म्हणतात आपण केलेल्या पुण्याचे फळ म्हणून चांगली माणसं आपल्या जीवनात येतात मला जीवनाला एक अर्थपूर्ण आयाम देतात .
मी काय पुण्य केले मला माहित नाही म्हणून मला पुनम सिस्टर अडीच वर्षासाठी का होईना पण भेटल्या आणि मी काय पाप केले ते मला माहित नाही म्हणून पुनम सिस्टर फक्त अडीच वर्षच माझ्यासोबत होत्या .
पण ते अडीच वर्ष किती मूल्यवान होते हे मला माहित आहे त्यासाठी मी पूनम सिस्टरांचा आणि जीवनाचा फार फार ऋणी आहे .
पुढे जन्म असतो माहित नाही पण असेल तर पुनम सिस्टर माझ्या खरोखरीच्या सिस्टर ' म्हणजे बहीण म्हणून मला मिळाव्या ही देवाकडे प्रार्थना .

 तसेच निवृत्तीनंतरचा काळ त्या सुखात समाधानात आनंदात राहो त्यांना उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा व प्रार्थना . धन्यवाद .
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .4
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, २६ जून, २०२४

दत्त नाम

दत्त नाम
*******

ध्यानाचे ही ध्यान जिथे हरवते 
ज्ञानाचे ही ज्ञान जिथे वितळते ॥१

तेच ते पावन दत्ता तुझे नाव 
असावे हृदयी होऊनिया भाव ॥२

रूपाचे ही रूपे जिथे मावळती 
शब्दांचे तरंग जिथे विरताती ॥३

ते रे शब्दातीत स्वरूप जे तुझे 
नाही मजलागी धैर्य जाणायाचे ॥४

म्हणुनी तुजला मागतो साधन 
सहज सोपान कृपेशी कारण ॥५

दत्ता सदा तुझे घडावे चिंतन 
व्हावे दत्तमय सरो माझेपण ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, २५ जून, २०२४

पा ऊ स

पाऊस
******
मातीतून नवतीचे गाणे उमलून आले 
निजलेल्या तृणबीजा 
स्वप्न एक पडले ॥१

जगण्याला जीवनाने सांगावे हे धाडले 
ऋतुचक्र एकवार 
उगमाला भिडले ॥२

नवी पाती भूमीवरी नवी फुले वेलीवरी 
नवेपण नवरंगी 
नवेपणी नटले ॥३

माझे मन नवे झाले सारे जुने धुतले 
उल्हासाचे स्वानंदाचे 
गाणे नवे जागले ॥४

ये रे मेघा ये गं सरी उचलुन सूर घेई 
कणोकणी हर्ष आता 
विश्व सारे दंगले ॥५

.🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...