मंगळवार, १६ सप्टेंबर, २०२५

भेट

भेट
****
पुन्हा एका वळणावर 
भेटलोच आपण 
अर्थात तुझ्यासाठी त्यात 
विशेष काही नव्हतं 
एक मित्र अवचित 
भेटला एवढंच 
माझंही म्हणशील तर 
तसंच काही होतं 

फार काही उरलं नाही 
मिळवायचं आयुष्यात 
आहे संतुष्ट बऱ्यापैकी 
जे काही मिळालं त्यात 
जर तर चे तर्क काही 
नाही उमटत मनात 
तर आता  फक्त एक
औपचारिकता तुझ्यामाझ्यात

अन त्या कवितांचं म्हणशील 
तुझ्यासाठी लिहिलेल्या 
होय आहेत अजून 
त्या माझ्या जुन्या डायरीत 
आज बघेन म्हणतो त्यांना मी 
पुन्हा एकदा शोधून 
माझी खात्री आहे 
त्या तिथेच असतील अजून

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, १५ सप्टेंबर, २०२५

पावूस परतीचा

पावूस परतीचा
**************
पाऊस परतीचा 
भिजलेल्या प्रीतीचा 
दान सर्वस्वाचे
देण्याच्या वृत्तीचा 

पाऊस परतीचा 
चार पाच दिसांचा
असंख्य भुरभुरत्या
मुलायम आठवांचा 

पाऊस परतीचा
अनावर ओढीचा 
निसटल्या क्षणांच्या 
हळुवार मिठीचा 

पावूस परतीचा
भिजलेल्या मातीचा
फोफावल्या गवतात 
बहरल्या स्वप्नांचा 

परतीच्या पावसात 
मन भरे काठोकाठ
अलगद ओघळते
काही दाटलेले आत

परतीच्या पावसात 
चिंब भिजून घेतो  
अन् गीत राहिलेले 
पुन्हा गावून घेतो 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शनिवार, १३ सप्टेंबर, २०२५

एक बाल कविता

 
 एक बाल कविता 
घाबरगुंडी 
*****************
उंदीर बघुनी ताई ची 
ती घाबरगुंडी उडाली 
धूम ठोकून ती तो 
कॉट वरती चढली 

आवाजाने त्या गादी 
मागील पालही घाबरली 
सरसर करत ती मग 
माळ्यावर धावली 

पाल पाहून ताई ची 
बोबडीच वळली 
अन आईच्या अंगावरती
तिने उडी मारली 

तोल आईचा गेला ती 
पडता पडता वाचली 
एक धम्मक लाडू घेऊन 
ताई रुसून बसली
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

कवी सुनील जोशी

 
कवी सुनील जोशी एक आठवण
******************
या माणसाला 
मी कधीच भेटलो नाही प्रत्यक्षात 
तसे फोन कॉल झाले होते काही क्वचित 
पण हा माणूस भेटायचा 
त्याच्या कवितेतून नियमित 
त्याचे प्रेम होते राधेवर कृष्णावर
तसेच भाषेवर आणि शब्दावर 
अगदी शब्दातीत 
कुठलाही शब्द प्रसंग चित्र मिळणे
हे जणू व्हायचे एक निमित्त 
मग बसायच्या कविता 
जणू की पाऊस 
कधी रिमझिमत कधी कोसळत 

पण का न माहीत
दुसऱ्याच्या कवितेवर 
ते सहसा प्रतिक्रिया देत नसत 
आपल्या कवितेत बुडून गेलेले 
आपल्या रंगात वाहत असलेले
त्या स्व कवितेतून बाहेर पडायला 
फुरसत नसलेले 
आत्ममग्न शब्दमग्न व्यक्तिमत्व होते ते 

कविता क्वचित कुणाची अमर होते 
किंवा कालौघात थोडीफार टिकते 
अर्थात कविता लिहिणाऱ्याला 
त्याची मुळीच पर्वा न असते 
तसाच सुनील जगला 
त्या कवितेच्या विश्वात राहिला 
सदैव शब्दरत साधनारत 
मला वाटते हे असे जगणे 
यातच कवी होण्याचे सार्थकत्व असते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

गुरुवार, ११ सप्टेंबर, २०२५

कार्यकर्ता अन् पोट

कार्यकर्ता अन् पोट 
***************
मला नेहमी एक प्रश्न पडायचा 
या कार्यकर्त्यांचे पोट कसे काय भरत असेल 
ते साहेबांच पत्र घेऊन धावणारे 
विविध कार्यालयात फेऱ्या मारणारे 
आवाज करणारे विनंती करणारे 
आडनावा प्रमाणेच पक्ष असणारे 
काहींचे तंत्र विनंतीचे काहींचे तंत्र दबावाचे 
तर काहींचे दादागिरीचे पण सगळ्यात मोठे तंत्र 
मोबाईलवरील साहेबाच्या नंबरचे 
आणि डीपीवरील साहेबांच्या फोटोचे 
तर मग असाच एक कार्यकर्ता झाला 
ओळखीचा अन मैत्रीचा 
त्याला विचारला प्रश्न मनातला 
त्यावर तो हसला आणि म्हणाला 
या भानगडीत नकाच पडू साहेब 
पण सोपं गणित आहे मोठा वाटा छोटा वाटा 
लहान वाटा किंचित वाटा संपले गणित 
कळले तर कळले नाही तर द्या सोडून 
तसे भेटतात काही साभार आभार 
त्यात काम होऊन जातं 
लोकांचं काम होतं साहेबाचं नाव होतं 
आपलं निभावून जातं
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

बुधवार, १० सप्टेंबर, २०२५

हुजरेगिरी

हुजुरेगिरी 
********
येताच सत्ताधारी येताच पुढारी 
अफाट ऊर्जेने धावतात सारी 
सोडून आपले सोबती मित्र गणगोतही 
चिटकू पाहतात त्याला फोटोमध्ये होत सहकारी 
लागेल वर्णी कुठेतरी कुठल्या तरी मंडळावरती 
कुठल्यातरी समिती वरती किंवा 
शाखेची खुर्ची तरी मिळेल एक नावापूरती
सत्ता मिळाली ही प्रतिष्ठा मिळते 
अडवणूक करण्याची शक्ती मिळते 
त्यातून झिरपणारे धनही हाती पडते 
या फुकाच्या धनाची नशा काही औरच असते 
पाकिटा पासून खोक्यापर्यंत वाढत जाते
हेच तर या प्रत्येकाचे स्वप्न असते 
तिथे लागत नाही विद्वत्ता कर्तृत्व आणि चारित्र्य 
तिथे चालते थोडीशी चलाखी थोडीशी हुजरेगिरी
थोडा संधी साधूपणा हेच भांडवल 
आणि हे तर एकदम बेसिक असतं 
जे असते प्रत्येकाकडेच उपजत
कमी जास्त प्रमाणात 
फक्त हवा असतो तो हात वर चढायला
जो मिळायची शक्यता असते त्या हुजरेगिरीतून
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, ९ सप्टेंबर, २०२५

सारे तुज ठावे

सारे तुज ठावे 
***********
काय मी करावे कैसे वा रहावे 
सारे तुझे ठावे दत्तात्रेया

परी ऐसे तैसे करी देवराया 
मागतोसे वाया तुजलागी

मनाची या खोड जन्मांतरीची 
न आजकालची पडलेली 

म्हणूनिया क्षमा मागतो मी तुला 
तुझिया वाटेला ठेव मला

घाली अपराध माझे तू पोटात 
प्रभू माय तात तूच माझी 

तूच देई शक्ती सांभाळण्या भक्ती 
सदोदीत पदी राहू दे रे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

स्वामीभेट

स्वामी भेटी ******** कृपेचे कोवळे चांदणे पडले  स्वामी भेटी आले  अकस्मात  नसे घरदार नसे ध्यानीमनी  भाग्य उठावणी  केली काही  तोच स...