दिगंबरा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दिगंबरा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ९ सप्टेंबर, २०२५

सारे तुज ठावे

सारे तुज ठावे 
***********
काय मी करावे कैसे वा रहावे 
सारे तुझे ठावे दत्तात्रेया

परी ऐसे तैसे करी देवराया 
मागतोसे वाया तुजलागी

मनाची या खोड जन्मांतरीची 
न आजकालची पडलेली 

म्हणूनिया क्षमा मागतो मी तुला 
तुझिया वाटेला ठेव मला

घाली अपराध माझे तू पोटात 
प्रभू माय तात तूच माझी 

तूच देई शक्ती सांभाळण्या भक्ती 
सदोदीत पदी राहू दे रे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

गुरुवार, ४ सप्टेंबर, २०२५

दत्त व्हावे

दत्त व्हावे
********
इथे तिथे मज दिसो दत्त फक्त
जगण्याच्या आत एकमेव ॥

नको माझेपण जीवनाचे भान  
व्यापून संपूर्ण राहो दत्त ॥

कुणा काय देणे कुणाचे वा घेणे 
दत्ता विना उणे होऊ नये ॥

साध्य साधनेचे साधनची व्हावे 
दत्तात नांदावे सर्वकाळ ॥

प्रश्न जगण्याचे प्रजा प्रपंचाचे 
आजचे उद्याचे दत्त व्हावे ॥

एकच उत्तर अवघ्या प्रश्नाला 
यावे आकाराला दत्त रूपी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

रविवार, २४ ऑगस्ट, २०२५

कारण

कारण
******
तुझ्या पंखाखाली प्रीतीचा उबारा 
मिळतो आम्हाला दत्तात्रेया ॥१

वादळाची भीती मुळी ना वाटते 
टोचती ना काटे कोटराची ॥२

हालतात फांद्या वृक्ष गदगदा 
सांभाळाती सदा पंख तुझे ॥३

पाहतो आकाश तुवा पेललेले 
देही झेललेले ऊन पाणी ॥४

पाहतो कौतुक आमुच्या भाग्याचे
तुझिया प्रेमाचे अहेतूक ॥५

भरवसी दाना लागताच भूक 
सावलीचे सुख देसी सदा ॥६

दावसी आकाश आम्हा वेळोवेळी 
मारण्या भरारी बळ देसी ॥७

धन्य आम्हा देवे आपुलेसे केले 
कारण मिळाले जगण्याला ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०२५

लक्ष्य

लक्ष्य
*****
माझी प्रकाशाची हाव 
तुझ्या दारी घेई धाव 
असे पतंग इवला 
देई तव पदी ठाव 

गर्द काळोख भोवती 
जन्म खुणा न दिसती 
आला किरण लोचनी 
तूच दिशा तूच वस्ती 

असे जगत अंधार 
किती शिकारी भोवती 
पथ सुकर बिकट 
भय नसे माझ्या चित्ती 

जया दिसतो किरणा 
तया घेतसे ओढून 
तुझ्या असीम कृपेचे 
दत्ता मिळे वरदान 

तुज भेटण्या उत्सुक 
कणकण देहातील
चिंता नुमटे किंचित 
जरी ठाव न अंतर

मनी सुखाचे गुंजन 
मज कळे निजस्थान 
सुख कळण्यात थोर 
लक्ष्य अवधूत चिंतन

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

बुधवार, १३ ऑगस्ट, २०२५

दुर्लभ

दुर्लभ
*****
तुझी भक्ती दत्ता असे रे दुर्लभ 
मोतीयाचा गर्भ शिंपी जैसा ॥१
ज्याची कुळवाडी असे देवभक्ती 
सदाचार वृत्ती सर्वकाळ ॥२
ज्याचे मायबाप लीन तुझ्या ठायी 
पिकून पुण्याई फळे तिथे ॥३
जया अंतरात विरक्तीचे बीज 
जन्मा आलो लाज वाटे जया ॥४
तेच तुझे भक्त तुझे पदी रत 
असती मागत प्रेम फक्त ॥५
जया नको धन नको मानपान 
केवळ व्यसन तुझेच ते ॥६
तयाला प्रसाद तुझी या भक्तीचा 
देतोस तू साचा चोखाळून ॥७
मज त्या पदीचा करी रे किंकर 
सुखाचा सागर पावेल मी॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, १२ ऑगस्ट, २०२५

फुंकर

फुंकर 
******
माझिया प्राणात घाल रे फुंकर
विझव अवघा लागलेला जाळ 

मग मी जगेन होऊन निवांत 
तुझ्या सावलीत दत्ता दिनरात 

सगुण निर्गुण नको साक्षात्कार 
साधू गुरु बुवा नको चमत्कार 

जगावे जगणे जैसा की निर्झर 
निर्मळ सुख ते दाटून अपार 

नसावी मनात सुखाची हवाव
दुःखाने घडावी नच धावाधाव 

आले जे सामोरे जगणे घडावे
तुझ्या फुंकरीचे सुख न सरावे

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

स्वामीभेट

स्वामी भेटी ******** कृपेचे कोवळे चांदणे पडले  स्वामी भेटी आले  अकस्मात  नसे घरदार नसे ध्यानीमनी  भाग्य उठावणी  केली काही  तोच स...