श्रीपाद वल्लभ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
श्रीपाद वल्लभ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२६

संसार

संसार
****
संसार सरेना भोगणे ठरेना 
जगणे पुरेना उपाधीला

 एक तुटताच नवे उभे शिर 
ऐसा कारभार वासनेचा 

तेच जगी ताट तेच जगी पोट 
येईना रे वीट जीवनाचा 

इंद्रिय कौतुके किती ही लाळावी
भजनी वाळावी वृत्ती किती

आगा दत्तात्रेया येऊनिया भान 
जाते विसरून पुन्हा पुन्हा 

दगडाची रेघ मार मनावर 
नाम तयावर कोर तुझे

विक्रांता करी गा चिरा पायरीचा
खांब वा दारीचा तुझ्या प्रभू

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, २३ सप्टेंबर, २०२६

धिंडोरा

धिंडोरा
******
तुझिया कीर्तीचा पिटतो धिंडोरा   
दत्त दिगंबरा पानोपानी ॥

पाहिल्यावाचून  वर्णीतो रूपाला
गातसे कीर्तीला जागोजागी ॥

तुझिया कृपेचा देतो भरवसा 
पल्लवीत आशा करूनिया ॥

भरल्यावाचून माझी रिती झोळी 
करतो दिवाळी साजिरी मी ॥

मागे बहुतांची फळली रे भक्ती 
तया दत्त प्रीती फळा आली ॥

त्याच कथा गोड जीवी ठसवितो 
दास म्हणवतो आशेने मी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२६

श्रीदत्त

श्री दत्त
******
सारे व्यापूनी जगत 
व्यक्त अव्यक्त रूपात
विश्व पालक श्रीदत्त ॥१

शून्य होऊन निर्वात
गिळे सारे आसमंत 
शिव संहारक श्रीदत्त ॥२

चंद्र सुर्य प्रकाशात
खेळ खेळतो अद्भूत
ऐसा लीलाधर श्रीदत्त ॥३

नच कळता कळत 
ठसा उमटे चित्तात 
ऐसा अगम्य श्रीदत्त ॥४

जरी रुप नामातित 
परी पाहता मनात 
दिसे भक्तास श्रीदत्त ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, १२ सप्टेंबर, २०२६

दत्त पहावा

दत्त 
****
दत्त भजावा मनात दत्त पहावा जनात 
दत्त धरावा उरात 
सर्वकाळ 
दत्त जाणावा सुरात दत्त ऐकावा स्वरात 
दत्त वाचावा पदात  
अनुपम्य 
दत्त पूजावा मूर्तीत दत्त भजावा कीर्तित 
दत्त स्मरावा प्रीतीत 
सदोदित 
दत्त प्रेमाचा पुतळा दत्त लावण्याची कळा 
दत्त शांतीचाच मळा 
मुमुक्षास
दत्त गातागाता मन गेले प्रेमाने भरून 
दत्त कविता होवून 
आले असे 
दत्त मायबाप माझे दत्तकृपा छत्र माझे
दत्त जीवीचे प्रीतीचे 
आत्मभान 
ऐसे जाणूनिया दत्त झाला उगा हा विक्रांत 
बसे एकटक दत्त  
न्याहाळत 
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, १० सप्टेंबर, २०२६

जगण्याच्या वाटा

जगण्याच्या वाटा 
*************
जगण्याच्या माझ्या वाटा 
दत्ता याव्या तुझ्या पथा 

वाहिलेला भार आता 
उतरावा तुझे हाता 

काय काय पोतडीत 
आलो मी रे साठवित

ज्ञान अहंकार मोठा 
देह जन्म वर्ण ताठा

मोडूनिया पाठ गेली 
पाऊले ही भार झाली 

तुझ्याकडे ती येणारी  
चाल आता मंद झाली

आता नको मोकलूस 
दूर दूर ढकलुस 

देई आता दृढ भाव
दावी चैतन्याचा गाव


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, ९ सप्टेंबर, २०२६

कृपेची घागर

कृपेची घागर
***
कृपेची घागर ओत डोक्यावर 
जावा मनोमळ वाहूनिया  ॥१

घेई रे कृपाळा तुझा तू करून 
शुचित्व देऊन दगडा या  ॥२

जगत हे व्यर्थ मनी समजलो
तव पदी आलो दत्तात्रेया ॥ ३

चुकला विचार बाटला आचार 
करी रे स्वीकार प्रक्षाळून ॥  ४

माय तू स्नेहाळ प्रेमाची केवळ 
चुकल्या सांभाळ लेकरा या ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२६

बंध

बंध
***
मी नच कुणाचा जरी जाणतो रे 
तरी वाहतो रे बंध उरी    ॥

मित्र सखे प्रिय जपे नाती गोती 
जमे सभोवती गर्दी बहु ॥

वाहतो कर्मात उणा व्यवहारी 
जाणे पाने सारी शिशिराची ॥

कुणा उगा सोडू कुणा बळे धरू 
कुणा प्रीती करू सारे तुची ॥

तूच दिले दत्ता सारे प्रियजन 
अन वैरावीण ठेवियले ॥

ठेवियले तैसा राहीन मी दत्ता 
सदोदित चित्ता  परी रहा 

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, ४ सप्टेंबर, २०२५

दत्त व्हावे

दत्त व्हावे
********
इथे तिथे मज दिसो दत्त फक्त
जगण्याच्या आत एकमेव ॥

नको माझेपण जीवनाचे भान  
व्यापून संपूर्ण राहो दत्त ॥

कुणा काय देणे कुणाचे वा घेणे 
दत्ता विना उणे होऊ नये ॥

साध्य साधनेचे साधनची व्हावे 
दत्तात नांदावे सर्वकाळ ॥

प्रश्न जगण्याचे प्रजा प्रपंचाचे 
आजचे उद्याचे दत्त व्हावे ॥

एकच उत्तर अवघ्या प्रश्नाला 
यावे आकाराला दत्त रूपी ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

रविवार, २४ ऑगस्ट, २०२५

कारण

कारण
******
तुझ्या पंखाखाली प्रीतीचा उबारा 
मिळतो आम्हाला दत्तात्रेया ॥१

वादळाची भीती मुळी ना वाटते 
टोचती ना काटे कोटराची ॥२

हालतात फांद्या वृक्ष गदगदा 
सांभाळाती सदा पंख तुझे ॥३

पाहतो आकाश तुवा पेललेले 
देही झेललेले ऊन पाणी ॥४

पाहतो कौतुक आमुच्या भाग्याचे
तुझिया प्रेमाचे अहेतूक ॥५

भरवसी दाना लागताच भूक 
सावलीचे सुख देसी सदा ॥६

दावसी आकाश आम्हा वेळोवेळी 
मारण्या भरारी बळ देसी ॥७

धन्य आम्हा देवे आपुलेसे केले 
कारण मिळाले जगण्याला ॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

बुधवार, १३ ऑगस्ट, २०२५

दुर्लभ

दुर्लभ
*****
तुझी भक्ती दत्ता असे रे दुर्लभ 
मोतीयाचा गर्भ शिंपी जैसा ॥१
ज्याची कुळवाडी असे देवभक्ती 
सदाचार वृत्ती सर्वकाळ ॥२
ज्याचे मायबाप लीन तुझ्या ठायी 
पिकून पुण्याई फळे तिथे ॥३
जया अंतरात विरक्तीचे बीज 
जन्मा आलो लाज वाटे जया ॥४
तेच तुझे भक्त तुझे पदी रत 
असती मागत प्रेम फक्त ॥५
जया नको धन नको मानपान 
केवळ व्यसन तुझेच ते ॥६
तयाला प्रसाद तुझी या भक्तीचा 
देतोस तू साचा चोखाळून ॥७
मज त्या पदीचा करी रे किंकर 
सुखाचा सागर पावेल मी॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शनिवार, ९ ऑगस्ट, २०२५

रक्षा बंधन

रक्षा बंधन 
*********
रक्षिलेस तू सर्वदा 
दूर धाडूनी आपदा 
काचली गाठ तरीही 
तोडला न कधी धागा 

थोर माझी ही पुण्याई 
म्हणून दारी आलो गा 
सारी ही तुझीच लीला 
कृपासिंधु तू श्रीपादा

तूच बंधू  हितकारी 
जन्मोजन्मी पाठीराखा 
तूच खेळगडी गोड
जीवलग प्रिय सखा

काय मागू तुला आता 
जीव प्राण ओवाळला
मिसळूनी ज्योत जावी
ज्योतीत तुझ्या कृपाळा

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

संसार

संसार **** संसार सरेना भोगणे ठरेना  जगणे पुरेना उपाधीला  एक तुटताच नवे उभे शिर  ऐसा कारभार वासनेचा  तेच जगी ताट तेच जगी पोट  येई...