सोमवार, २४ जून, २०२४

मौन


मौन
****
तुझे बोलणे थांबते माझे मौन घनावते
शब्दावाचूनही काही स्पर्शातून बरसते ॥१

शब्द शब्द वादळतो अर्थ अर्थ निनादतो 
जीवतळी निजलेला कणकण जागा होतो ॥२

तुझे बोल थांबू नये जरी मनास वाटते
तुझे अबोल मार्दव मज धुंद वेडावते ॥३

तुझ्या सुरी सुरावतो श्वास माझा झंकारतो 
क्षण क्षण सवे तुझ्या जन्म जणू मी जगतो ॥४

तुझे मौन ही अल्लड मज दूर कुठे नेते 
स्वप्नजागृती धूसर सुख सुखात भिजते ॥५

तुझे मौन माझे मौन गीत एक उमलते 
तुझा सुर माझे गाणे तूच पुन्हा हरवते॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, २३ जून, २०२४

ब्रीद

ब्रीद
*****

कुणा कधी भेटूनिया 
मुखी घास भरवतो 
ओळखी वाचून कुणा 
गूढ गुज हाती देतो ॥
माझ्यासाठी अवधूता
काय पाय थकतात
दोन घास देण्यासाठी 
हात मागे सरतात ॥
असेलही कुरूप मी
मातीमध्ये मळलेला 
मनाचिया चिखलात 
कधी कुठे पडलेला ॥
तुझ्याविना पण कोण 
मजलागी पुसणार 
धुवूनिया भक्ती प्रेमे
जवळी रे करणार ॥
माय बाप सखा तूच 
अन्य कोणी ना आधार 
दीनबंधू दीनानाथ
ब्रीद करी रे साकार ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, २२ जून, २०२४

न रमते

न रमते
******

जर मी पक्षी झालो तर तू 
आकाश होशील का ?
जर मी मेघ झालो तर तू 
पृथ्वी होशील का?
जर मी दिवा झालो तर तू  
ज्योत होशील का ?
अपूर्णत्व हरवून मज तू
पूर्णत्वाला नेशील का ?
या जगण्याच्या बेटावरती 
जीवन सौख्य देशील का ?

असे एकटे जगणे खोटे 
मन एकाकी नच ते रमते ॥
जीवन सुत्रधारास्तवही
दुजे पणात विश्व घडते ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

बुधवार, १९ जून, २०२४

अवधूता

अवधूता
*******
अवधूता तुझे गाणे 
मजला सुचत नाही 
मृदुंगाची साथ अन
टाळ झंकारत नाही ॥१

अवधूता तुझी वाट
मज सापडत नाही 
निशाणाच्या खुणा अन
ठसे ही दिसत नाही ॥२

अवधूता तुझे प्रेम 
मजला भेटत नाही .
संसाराची व्यथा अन
बंधन तुटत नाही ॥३

अवधूता शोधू कुठे 
कुणीच सांगत नाही 
धावतो मी रानोमाळ 
दिशा ती कळत नाही ॥४

अवधूता येई आता 
त्राण या देहात नाही 
पुसूनी प्रारब्ध माझे 
मजला मिठीत घेई ॥५

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, १७ जून, २०२४

पाउस म्हणतो

पाउस म्हणतो
***********
वारा म्हणतो अडेल मी 
पाणी म्हणते पडेल मी 
या मातीच्या कणाकणातील 
बीज म्हणते रुजेल मी ॥१
तळे म्हणते भरेल मी 
माती म्हणते भिजेल मी 
या रानातील इवले इवले 
झाड म्हणते फुलेल मी ॥२
मोर म्हणतो नाचेल मी 
चिऊ म्हणते हसेल मी 
ओढयातील डबक्या मधला 
बेडूक म्हणतो फुगेल मी ॥३
मांजर म्हणते लपेल मी
मोत्या म्हणतो घुसेल मी 
पश्चात्तापी झाड तोड्या 
माणूस म्हणतो जगेल मी ॥४
पाऊस म्हणतो झाडे जगवा 
तरच इथे येईल मी ॥
वने जाळता झाड तोडता 
रे माघारी जाईल मी ॥५
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, १५ जून, २०२४

मैत्री सल्ला

मैत्री सल्ला
*************
तुझे प्रेम कोणासाठी 
रानोमाळ भटकते 
वेचूनिया आकाशीचे
शब्द शब्द जमवते  ॥१
हळुवार कुजबुज 
जणूकी वाटे स्वतःशी 
गहनशा संवादात .
बुडलेली हिमराशी ॥२
कोणी येता जवळ ते 
ओठ घट्ट मिटतात 
स्वप्नातल्या पापण्याही 
पुन्हा येती जगतात ॥३
एकांताची ओढ तुझी 
पण लपतच नाही 
डोळ्यातील चमक ती 
खोटे बोलतच नाही ॥४
पण जरा जपूनच 
राहा माझे सखी राणी 
वादळात प्रेमाच्या या 
बुडालीत किती कोणी ॥५
सुंदरशा प्रेम वाटा 
घाट परी निसरडे 
चाल घट्ट धरूनिया 
जिवलग मित्र कडे ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

राजा बोले

राजा बोले
*******
राजा बोले दळ हाले 
होय होय करू करू 
एक एक मान डोले ॥१

आणि झाले नाही तर 
नाही तर नाही तर
कानामध्ये घालू बोळे ॥२

शिपायाला देवू सुळ
सेनापली हद्दपार
नेमु  नवे मर्जीतले ॥३

देईल जो नजराना 
त्याच्याकडे डोळा काना
दरिद्री ते उगा मेले ॥४

तसा राजा मांडलिक 
वर कुणी नेमलेले
तया उरी बसलेले ॥५

शिपायांचा खेळ चाले 
आले आणि किती गेले
पोटासाठी किती मेले ॥६

आज आला आज गेला 
उद्याचे रे  बघू चला
देणे सारे ठरलेले ॥७

ऐका कोणी ऐकू नका
राजापुढे फक्त झुका 
दिन जाती उरलेले ॥८

होय होय करू करू 
हंड्यावर हंडे भरू 
गळू दे रे टाकी गळे  ॥९

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...