शनिवार, १० जून, २०२३

पाहणारा

पाहणारा
********
हरण्याचे भय आता मज नाही 
मरण्याचे भय आता मज नाही
झालो वस्तीकर मी रे दत्त पायी

भोगण्याची लाज आज मज नाही 
त्यागण्याचे काज आज मज नाही 
दिसू आले मन पाहत मी राही 

उजेड अंधार अवघाची भास 
चालला उतारी पाण्याचा प्रवास
कळू येता मग कुठला हव्यास 

घेतला उदार दत्त कारभार 
सरली उधारी चोख कारभार
विक्रांत मनात शून्याचा व्यापार

चालतो बोलतो खेळतो ही बरा
आत उघडला मिटलेला डोळा
आणि मरू गेला सारे पाहणारा

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘




गुरुवार, ८ जून, २०२३

विघ्न विनाशक

विघ्नविनाशक
***********

सांगितल्याविन येतात संकट 
नाना ती बिकट  मनुष्याला ॥१

केल्याविना पाप मागे लागे लाव 
जाऊ वाटे जीव भयानेच ॥२

निळीयाचा हार होतो समजत 
विखार तो होत डसू लागे ॥३

अशावेळी देव विघ्नविनाशक 
स्मरे गणनायक आर्त होत ॥४

मग तो कृपाळ करितो सांभाळ 
देऊनिया बळ सात्विकसे ॥५

विक्रांत अवघी सरे खळबळ
होतसे नितळ शांत मन ॥६

पुण्याईचा झेंडा फडके नभात 
वीज येवो वात प्रारब्धात ॥७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

बुधवार, ७ जून, २०२३

सत्ता

सत्ता
****

राजे येतात राजे जातात 
क्षणभर टिकतात 
काही काळ दिसतात
अन जसे निर्माण होतात 
तसे अस्तास ही जातात 

कधीतरी कुठेतरी कुणी 
कुठल्यातरी दंतकथेत, पुराणात  
गोष्टीच्या वा इतिहासाच्या 
पुस्तकात जाऊन बसतात

जसे की
विक्रमादित्य चंद्रगुप्त अशोक छत्रपती 
पुष्यमित्र शुंग पौरस सिकंदर मिलिंद 
सातवाहन गुप्त चालुक्य यादव
यवन मोगल फ्रेच इंग्रज पोर्तुगीज
वाढवाल तेवढी यादी वाढते

तर मग तुम्ही 
तुमच्या आणि आमच्या साहेबाचं 
काय घेऊन बसलात
उगवत्या सूर्यास रोज नमस्कार मिळतात मावळत्या सूर्या सर्वच निरोप देतात

मी कुणाचातरी साहेब आहे म्हणून 
मला नमस्कार मिळतात 
माझे कुणीतरी साहेब आहेत म्हणून 
माझे नमस्कार त्यांच्याकडे जातात
प्रत्येक साहेबाच्यावर एक साहेब असतो
प्रत्येक जण हुकूम वाहत असतो
सार्वभौमत्वाचा बुडबुडा तर क्षणिकच असतो

खरंतर सत्ता आहे तिथेच असते 
एक मुखवटा घेऊन उभी असते 
पण त्या मुखवट्या खालील 
चेहरे मात्र सतत बदलत असतात
सत्ता कधी मुकादम होते 
तर कधी कमिशनर होते
कधी सचिव होते तर 
कधी मंत्री पदावर बसते

कशीही असो कुठलीही असो 
पण सत्ता प्रत्येकालाच प्रिय असते
कारण सत्ता हे अहंकाराचे अत्यंत 
मोहक अन व्यापक रूप असते

एक लाट वर येते 
एक लाट खाली जाते 
जीवनाचे चक्र वाहतच असते
पण त्या लाटेवर स्वार व्हायला 
प्रत्येक अहंकाराला आवडत असते
पण अधिकाराची हरेक लाट 
त्या अहंकारा सकट बुडत असते

सत्तेवर अधिकारावर असूनही 
ज्याला या अहंकाराच्या लाटेची  
जाणीव असते
त्याला मात्र ती कधीच बुडवत नसते.
त्याचेच त्या अथांगाशी नाते जुळलेले असते.

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

सोमवार, ५ जून, २०२३

भक्ती दीप


भक्ती दीप 
*******
देई सुख तया जयास ते हवे 
मज न ठकावे दत्तात्रेया ॥ 

देई  धन तया जया त्याचे मान 
मज गुणगान गाऊ दे रे ॥

नको बांधू देवा उरी या पाषाण 
सोन्याचा म्हणून भुलवून ॥

नको मज स्तुती मित्र तेरे स्वार्थी 
वहावा ही खोटी कामासाठी ॥

जग विसरावे अंतरी पहावे 
स्वरूपी राहावे ऐसे व्हावे ॥ 

जन्म मरणाच्या लाख लाख वाटा 
रहावा पेटता भक्ती दीप ॥

विक्रांत तुझिया प्रेमा आसावला 
देह हा अर्पिला पायी सदा ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

रविवार, ४ जून, २०२३

गिरनार जग


गिरनार जग 
*********
असे वेगळे  रे जग ते वेगळे 
परी पाहिजे रे तेथ तू चालले ॥
पळू पळू वर प्रेमे येई जरा 
वळू वळू मागे पायरी उतारा ॥
डोळ्यात मुर्त धरा पादुकांना 
क्षण भेट ठेवा खोचूनिया मना ॥
दुखतील पाय होय गैरसोय 
घेई मजा तीही नको रे उपाय ॥
जर कोणी साथ दत्तभक्त भला 
काय वर्णू मग तया त्या भाग्याला ॥
भाव द्विगुणित मग एक एरा 
होय बोलणारा तोही ऐकणारा |
भेटेल दत्त रे भेटेल खचित 
धरू नको शंका मनात किंचित ॥
कळेल ते रूप नच वा कळेल 
आशिष खुण ती  हृदी उतरेल ॥
होईल परीक्षा तिथे तुझी काही 
झालास तर हो सुखे नापासही ॥
परी लिहिणारा तोही एक शेरा 
घडे संग त्याचा क्षण एक जरा ॥
हे रे काय कमी असे या जीवाला 
दत्त जडलेला राहो जगण्याला ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

शुक्रवार, २ जून, २०२३

लीला


लीला
*****
आता थांबव रे सारी धावाधाव 
मनातला गाव 
वाहणारा ॥
सरू दे रे यत्न तया जाणण्याचे 
जगी शोधण्याचे 
उगाचच ॥
जाहली जुनाट पुस्तकांची पाने 
केली पारायणे 
असू दे रे ॥
जाण तू तो आहे सबाह्य अंतरी 
प्रचितीच्या दारी 
थांबलेला ॥
अपेक्षा ओंजळी चातकांच्या चोची 
तैसी हो मनाची 
स्थिती काही ॥
जरी ठाव नसे कधी वर्षाकाळ 
डोळ्यात आभाळ 
साठव रे ॥
विक्रांत हे बीज दत्ता विरुढले 
जाणिवी फुटले 
आकाशात ॥
सांभाळ वा जाळ सारे तुझ्या हाती 
तुझ्यात चालती 
लीला तुझी ॥
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘


गुरुवार, १ जून, २०२३

कृपेचा

कृपेचा 
******
राखला हा देह माझा दत्तात्रेये 
हरवली त्राये एक एक ॥१
अन्यथा असता कधीच सुटला 
फुगा हा फुटला कुण्या क्षणी ॥२
कितीदा आपदी  मज रक्षीयले 
मरणा धाडीले माघारी ते ॥३
कितीदा आणले पुन्हा घरी दारी 
सुटू वाटेवरी जाता जाता ॥४
भरण्या खळगी भुके दोन वेळा 
पोटार्थी  विद्येला  पाठविला ॥५
आणि वर बळे दिला मानपान 
कृपाळ सघन ओघळला ॥६
लायकी वाचून निशाण पै केले 
चिरगुट नेले आभाळाला ॥७
किती किती वाणू दत्ता तुझे ऋण 
तुज ओळगेन  जिवेभावे ॥८
विक्रांत भाग्याचा जाहला दत्ताचा 
आणिक कृपेचा घर केला ॥९

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...