बुधवार, १३ जानेवारी, २०१६

दत्त गारुडी




बांधिला गाठीला
माल चोरलेला
गडगंज केला
सावकार

केली सोयरिक
मागुनिया भिक   
पोरबाळ पिक 
घर भरे

नाचतो अंगणी
कपडे फाडूनी
रात्रीस जागुनी
निद्रा दिनी

भिकेचे डोहाळे
जनास विकले
वाटेला लावले
मरू गेले  

मेलेल्या गावात
एकटा चौकात
सजल्या चितेत
रोज निजे   

धावूनिया दत्त
गारुडी तो येत  
केला विष मुक्त
विक्रांत हा 

विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/


मंगळवार, १२ जानेवारी, २०१६

अर्धा डाव







अर्धा डाव हरलेला
अर्धा अजून बाकी आहे 
विस्कटलेल्या रेषा
वाळू अजून बाकी आहे

तसे तर जगणे जगाचे
अवघेच व्यर्थ असते
माझे मला कळायचे   
किती अजून बाकी आहे

माथ्यावरती रेषा वक्र
कधी आल्या न कळले
थराखाली रंगोटीच्या
लाली अजून बाकी आहे

तुझा कधी जाहलो हे
कुणालाच कळले नाही
विरघळल्यावीन माझेपण
खूप अजून बाकी आहे

द्यायचे तर सारे होते  
पण देता आले नाही
अदृष्टाचे जड कसले
ओझे अजून बाकी आहे

जोडायचे होते त्यांनी
अजूनही पाहीले नाही
पापण्यात जमा मीठ
होणे अजून बाकी आहे

जा उठून बा विक्रांत
अडायचे कारण नाही
चालायची वाट तुझी  
अर्धी अजून बाकी आहे


विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/




झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...