गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०१५

देवाच्या कारणे






घडो हे जगणे
देवाच्या कारणे
बाकी देणे घेणे
उरो नये ||
देहाची वासना
ठेवली बांधून
संपले म्हणून
काम तिचे ||
मनाची या हाव
मनालाच ठाव
कळला उपाव
त्याचा आता ||
वाहियले फुल
जैसे प्रवाहात
देवाच्या दारात
तैसे मी पण ||
आता  तरंगणे
अथवा बुडणे
जगणे मरणे
सोपस्कार ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

   

सोमवार, २ नोव्हेंबर, २०१५

तिच्यासाठी






निळे डोळे
नभ उधळत
केस मोकळे
हवेत लहरत

ती ये अलगद
पुनव चंद्रागत
लख्ख प्रभा
मनात सांडत

ऋतू ऋतूतून
रंग बदलत
गूढ स्वप्नांचे
पंख पसरत

थांब म्हणूनी
नच थांबते
येण्याची वा
वाट पाहते

किती जन्म
उगा भटकत
कर्म बंधने
ओढून घेत

तिच्यासाठी
पुन्हा आलो
भरून पावलो
तृषार्थ राहिलो

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, १ नोव्हेंबर, २०१५

जीवन हे ओवी एक व्हावे






ज्ञानेशाची भिंत ठावूक न मला
योगाग्नी पेटला मांडयासाठी ||
ज्ञानेशाचा रेडा सांगू नका मला
मेलेला उठला सच्चिदानंद ||
गीतेची टीका ग्रंथ तोची निका
भावार्थ दीपिका चमत्कार ||
एका ओवीसाठी एक जन्म घ्यावा
पुनःपुन्हा व्हावा संग ऐसा
अधिक मागणे नच अन्य काही
ज्ञानदेवा पायी लीन व्हावे ||
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०१५

नाथांचा तो नाथ





नाथांचा तो नाथ माझा दत्तनाथ
अवघा सनाथ पंथ केला ||१||
मच्छिंद्र गोरक्ष जालिंदर अन
कानिफ रेवण नागनाथ ||२||
भर्तरी चर्पटी चौरंगी प्रसिद्ध  
श्रेष्ठ नवनाथ शिकविले  ||३||
एकेका सूर्यास नभी मांडियले
विश्व पुंजाळले भक्तीयोगे ||४||
योगिया जीवांच्या सेवेसी लाविले
पथ सजविले मोक्षाचिये  ||५||
जात भेद पंथा चूड लावियले
विश्व ओवियले एका धागी ||६||
फकीर मलंग बटू अन पिसा
एक तत्व ठसा दावियला ||७||
होवुनी दयाळ दावली पावुले
जीवन जाहले धन्य माझे ||८||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

प्रार्थना

प्रार्थना ******* जाहले दर्शन तृप्त झाले मन  देखीले सगुण  परब्रम्ह  हास्य मुग्ध मुखी हात उंचावले  आशिष भरले  प्रेममय  परमपवित्र ...