गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०१५

जन्म सरत नाही साला





जन्म सरत नाही साला
निरुद्देश चाललेला
पोटासाठी  बांधलेला
खुंट्यास कुण्या  ||

जीव कळत नाही साला
कुठे कुठे सांडलेला
कुणासाठी थांबलेला  
वेड्यागत खुळा ||

जगायचं कशाला
प्रश्न खाज सुटला
साल सोलटून गेला
अनुत्तरीत  ||

भोगातल्या क्षणांचा
हा डंख अतृप्तीचा
किती जन्म वाहायचा
नामर्दपणे ||

जगणाऱ्यांनो जगा रे
खिसे पोट भरा रे 
एक दिशी मरा रे
तोंड वासून ||
तिरडी आपुली बांधून
चाललो खांदी घेवून
अवघा जाणून सोडून
पसारा मी ||



विक्रांत प्रभाकर तिकोणे 

http://kavitesathikavita.blogspot.in/










मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०१५

|| अत्रीनंदना कृपा करी रे ||







 

तुझी करणी ज्ञात कुणाला
रे आला गेला वारा कुठला
तुझे रूप कधी कसे अन
रे कुणी पहिले सांग डोळा  

पोथीमधल्या सुरस कथा
कधी येतील मम वाट्याला
नकोच हंडा म्हैस दुभती
संपत्ती ती दिली रजकला  

अंगसंग क्षणिक दे जो  
रेवणनाथा पथी जाहला
दे देह मज चतुष्पदी तो
तव पदी सदैव राहीला  

घार होवून तू माझ्यासाठी
झेप घेवूनी ने उचलुनी
हो वनराजा गर्जत येवूनी
भक्ष्य जाय हे तव घेवूनी  

उभा कधीचा मी तव दारी
अत्रीनंदना कृपा करी रे
हे करुणाकर भक्तवत्सला  
मरणाचा या अंत करी रे  


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



प्रार्थना

प्रार्थना ******* जाहले दर्शन तृप्त झाले मन  देखीले सगुण  परब्रम्ह  हास्य मुग्ध मुखी हात उंचावले  आशिष भरले  प्रेममय  परमपवित्र ...