सोमवार, २३ ऑक्टोबर, २०२३

नर्मदामाई


नर्मदामाई
********
अडकला प्राण माझा 
माई तुझ्या तीरावर 
खळाळत्या प्रवाहाने 
जीव होई खालीवर ॥१
कलकल नाद जेव्हा 
येतो तुझा माझ्या कानी
कौतुकाने आनंदाने  
गाली ओघळते पाणी ॥२
विशाल रूपाने जेव्हा 
भेटतेस सरोवरी 
दडपते छाती माझी 
लीन होतो पदावरी ॥३
किती घाट किती थाट 
जागोजागी विखुरले 
भक्ती लोट पाहुनिया 
मन माझे गहिवरे ॥४
तुझ्या स्पर्शासाठी मन 
सदोदित हे व्याकुळ 
तुझ्या कुशीत येण्याला 
हा जीव असे आतुर ॥५
तुझ्या तीरी जन्म मिळो 
जर असे मज माई
फक्त तुझे प्रेम लाभो 
अन्य नको मज काही ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मेघ सावळी

मेघ सावळी ******** मेघ सावळे व्याकुळ ओले जेव्हा  निळ्या नभात जमले हर्षनाद तो गंभीर गहीरा ऐकून वेडे मन बावरले शामल रूप लोभसवाने  ...