बुधवार, २० जुलै, २०२२

गैरसमज


गैर समज
********

माझ्या कविता वाचून 
समजू नकोस की 
मी प्रेमात आहे 
तुझ्या अजून 

हे तर शब्दांचं इमान 
मी ठेवलं आहे राखून 

खरंतर तसं तुझं येणं  अन जाणं 
शब्दांना मिळाले होते एक कारण 
यायला उमलून 

पाऊस पडणं 
टाकी फुटणं 
वा कुणी पाणी घालणं 
ओलाव्याला लागतेच 
काही कारण 

ते घडून गेले की 
बीज जाते रुजून 
आणि रोप येथे उगवून 
फुलं फुलतच राहतात 
कविता उमलतच राहतात 
एका मागून एक 
जीवनाचं सत्व 
शब्दात ओतून 
स्मृतीचा दरवळ 
स्वतःत भरून 

अन ती ओल 
तिलाही अंत आहे 
कदाचित तोवर 
येईल ही दुसरा ऋतू 
दुसरा पानाडी 
कुठल्यातरी टाकीचं
होईलही
अपघाती फुटणं 

कारण कालचक्र 
अनंत आहे 
आणि हे जीवनही
या कवितातेत 
गुफटलेले.


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गिरनार परिक्रमा

गिरनार परिक्रमा *********** सरला प्रवास परी तुझा भास  वेढून मनास आहे दत्ता ॥१ माझे पदरव मज ऐकू येती  तरंग  गुंजती पाण्यावर ॥२ पा...