रविवार, ३ जुलै, २०२२

झेंडा


झेंडा 
*********

तुम्ही तुमचा झेंडा 
लादू नये माझ्यावर 
केवळ यासाठीच मी
उभा राहतो 
माझा झेंडा घेऊन 
माझ्या खांद्यावर 

अन्यथा मी जाणतो 
झेंडा हे कापड आहे 
अन आधाराची काठी 
हे लाकूड आहे 

हिरवा पिवळा निळा 
रंग तसे निरुपद्रवी असतात
छान सुंदर दिसतात 
अन पाहता प्रेमाने त्याकडे
 जीवाला सुखावत 

पण मी जाणतो 
तुमच्या झेंड्याखालील 
तुमची निष्ठा 
समोरील झेंड्याला 
धुळीत झोपायची 
तुमची मनीषा 
ती जर नसती तर 
मीही नाचलो असतो 
तुमच्या सवेत 
कधी घेत तो ही झेंडा 
या माझ्या खांद्यावर 

मी नाही ओढत कुणाला 
माझ्या झेंड्याखाली 
तोच आग्रह असतो 
 माझा तुमच्याकडून

अन हो एक मागणे ही
जेव्हा गरज येते 
झेंडा झाडाखाली ठेवायची 
आणि एकत्र यायची 
तेव्हा झेंड्याची हुल्लडबाजी
कोणी करू नये 
एवढेच 


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...