सोमवार, १८ जुलै, २०२२

प्रयोजन


प्रयोजन
*******

विस्मृतीच्या क्षितिजावर आता तू 
एखाद्या दूरवर जाणाऱ्या 
जहाजाच्या डोलकाठीगत
क्षणात दिसतेस क्षणात हरवतेस

आता आताच होती इथे किनाऱ्याला 
पाहता पाहता गेली दूर क्षितिजाला 

तुझे जाणे अपेक्षितच होते
कारण तू आहेस  एक जलपरी 
एक स्वप्नांचे गलबत 
पाठीवर आकांक्षाचे ओझे
घेऊन निघालेले जीवन 

आणि मी इथे 
या शिळेवर गोठलेला बांधलेला 
एक दीपस्तंभ 
आकाशात डोके खुपसून
लाटांमध्ये  पाय सोडून
पाहतो आहे तुला सदैव 

कधी येशील न येशील 
कधी पाहशील न पाहशील 

लाटांच्या नर्तनात 
वार्‍याच्या हेलकाव्यात 
सुखाच्या साम्राज्यात 
राहशील नाचत 
मग्न आपल्याच विश्वात 
सागारातील प्रवाहात
प्रवाळात शिंपल्यात
रंगीबेरंगी मासोळ्यात
निळ्या पांढर्‍या पक्ष्यात
दूरदूरच्या विश्वात

पण कधीतरी वादळात 
आठवशील मला तू 
किनार्‍याचे स्थैर्य 
मागशील मला तू 
संकटात घडीभर 
येशील माझ्याकडे तू
तेवढेही सौख्य पुरे आहे मला 

अन नाही आले वादळ तरीही
मी तुझ्यासाठीच इथे आहे 
हे मला पक्के ठावुक आहे 
अन माझ्या असण्याचे 
प्रयोजन तू असावीस
याहून मोठे भाग्य ते कुठले 


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...