विपर्यास्त
*********
विपर्यास्त झालेले सत्य
विझलेल्या सूर्याचा
कृष्णविवरात झालेला
अटळ अस्त
अनंत ऊर्जांची फेकली
गेलेली स्पंदने
एकवटतात पुन्हा माझ्यात
होत स्वकेंद्रित
अन मी जातो
गुरफटत
न सुटलेल्या प्रश्नात
ओढत शोधत
अस्तित्वाच्या खुणा
पण कृष्णविवर व्हायला
तुम्हाला अगोदर
सूर्य व्हावं लागतं
अन्यथा लाखो ग्रह
अन अशनी
असतात फिरत
कुठल्यातरी
अज्ञात चुंबकीय वर्तुळात
कोणी म्हणतात
प्रकाशाची दुसरी बाजू
अंधाराचे असते
पण मला वाटते
असे काही नसते
डोळ्यांच्या परिमाणाने
जग ठरत नसते
तर मग सत्यही
एक कल्पनाच नसेल
हे कशावरून ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा