शनिवार, १३ मार्च, २०२१

आठवून दत्त

आठवून दत्त
*********:

आठवून दत्त 
मनी होतो स्वस्थ
आणि कुठे चित्त 
लागू नये  ॥१

सुखाचा पाऊस 
ओघळतो आत 
वाहतात पाट
स्वानंदाचे ॥ २

कर्पुर गौरम 
तेजस आनन  
रुद्राक्ष भूषण 
मनोहर ॥३

शिरी जटाभार 
हातात त्रिशूळ 
त्रिगुण समूळ 
नष्ट करी  ॥४

दिगंबर देही 
कमंडलू हाती 
सर्वांगी विभूती 
दाटलेली ॥५॥

सभोवती श्वान 
बागडती चार 
युगे जणू चार
नम्रभावे ॥६॥

प्रेमाची ती मुर्त 
प्रसन्न गावुली
अवनी जाहली 
प्रेमबळे ॥७॥

स्वामी जगताचा
विक्रांता विसावा 
सदैव राहावा 
ह्रदयात ॥८॥

******

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...