मंगळवार, ९ मार्च, २०२१

ज्ञान आणि मनोरंजन

ज्ञान आणि मनोरंजन 
**************

ज्ञान आणि मनोरंजन 
यांचे जर झाले भांडण 
तर या भांडणात बहूदा
मनोरंजनच जिंकून जाते

खरतर ज्ञान तसे भांडत नसते 
पण आपला आग्रह सोडत नसते 
अन् मनोरंजनाला तर 
कसलीच पर्वा नसते 
रीतसर परवानगीचीही कुणाच्या 
मुळीच गरज नसते 

मनोरंजनाला हवी असते 
सुटका कामाच्या व्यापातून 
सुटका अधिकाराच्या दडपशाहीतून 
सुटका रोजच्या त्याच जीवनक्रमातून 
आणि अर्थातच 
सुटका सार्‍याच कटकटीतून 

कामावरून लवकर 
पळून जाणारी ड्युटी 
सहज थांबती होते 
अन मनोरंजनात रंगून जाते

ज्ञानाचे फायदे असतात 
अनुभव हजार गोष्टी सांगतात 
पण मुख्य म्हणजे या गोष्टी 
सामाजिक जाणिवेला जाग्या करतात 
रुग्ण बांधिलकी 
अन्याय  अत्याचार यांना 
बळी पडणार्‍या व्यक्तींबाबत 
कळकळ जर वाटत नसेल 
तर व्यर्थ असते 
तुमचे तथाकथित 
रुग्णसेवेचे व समाजसेवेचे व्रत 

ज्ञान हेच सांगू पहात असते त्यांना 
पण ते निवडतात मनोरंजनाचा रस्ता 
मग ज्ञानाची एक दमदार सर 
वाया जाते त्यांच्या आयुष्यातून 

उपनिषदात 
दोन ध्येय सांगितले आहेत जीवनाचे 
एक  श्रेय अन दुसरे प्रेय 
ज्यांनी प्रेय निवडले
त्यांना काय म्हणावे?
अर्थात
निवडीचा हक्क होता त्यांना
पण त्यांनी काय गमावले 
हे कळायलाही 
ज्ञान असावे लागते 
नाही का?
******:

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तुझ्यासाठी

तुझ्यासाठी ********* मनावरी गोंदलेले नाव तुझे हळुवार सांग तुला दावू कशी प्रेम खूण अलवार ॥१ डोळ्यातील चांदण्यांना तुझ्या ...