शनिवार, १३ मार्च, २०२१

प्रमेय


प्रमेय( उपक्रमासाठी )
****


एक दुपार परीक्षेची 
वहीत अडल्या भूमितीची 
विखुरलेल्या दप्तराची 
शाई सोडणाऱ्या पेनाची 
होती रेंगाळत 
हलकेच सरकत 
उष्ण झोत वाऱ्याचे 
अंगावरून वाहत 

समोर होते तेच प्रमेय 
तू सोडविलेले फळ्यावर 
केस मागे सारत 
पुड खडूची झटकत 
जणू माझ्या डोळ्यासमोर 
एक कविता होती उमलत 

तुझे शब्द होते स्पष्ट 
गृहितकही पक्के पाठ 
ओळीमागून ओळी त्या
सहज होत्या झरत

अन सुटताच ते प्रमेय 
विजय मिरवणारे तुझे ओठ 
बाईंची शाबासकी झेलत 
जगत्जेत्याच्या अविर्भावात 
तू बाकावर जाऊन बसलीस 
निसटत्या नजरेने माझ्याकडे पाहत 
माझ्या डोळ्यातील कौतुक वेचत 

ती माझी पहिली कविता 
माझ्या मनात होती नाचत 
शब्दावाचून अर्थावाचून 
मला न कळणाऱ्या 
गृहीतकांना डावलून

******
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...