रविवार, ७ मार्च, २०२१

श्री जगन्नाथ कुंटे ऊर्फ अवधूतानंद यांना श्रद्धांजली


श्री जगन्नाथ कुंटे ऊर्फ अवधूतानंद यांना श्रद्धांजली  
*******

पाहियले स्वामी
अवधूतानंद
शक्तिचा तरंग 
उत्स्फुलित ॥१॥

पुत्र नर्मदेचा 
पुत्र शंकराचा 
पुत्र श्रीगुरूंचा 
कृपांकित ॥२॥

बेछुट शब्दात 
असे कळकळ 
भक्ती तळमळ 
कणोकणी ॥३॥

नाही लपविणे 
सोंग वठविणे 
जगी मिरविणे 
लाचारीत ॥४॥

जैसा वृक्ष  वाढे 
तैसे  ते दर्शन 
निगेच्या वाचून
नभी जाणे ॥५॥

तपी तपिन्नला 
भक्तीत निवाला 
साधनी रंगला 
आत्मतृप्त ॥६॥
 
कृपेचे प्रसंग 
किती जीवनात 
नांदे भगवंत 
मागेपुढे ॥७॥

परी नाही गर्व 
ताठा कसलाच 
श्रेय गुरुलाच 
सर्वकाही ॥८॥

वाचताना ग्रंथ 
किती धडे दिले 
डोळे उघडले 
वेळोवेळी ॥९॥

साधनेचे प्रेम 
कृपा नर्मदेची 
दुनिया तयाची
अद्भुतशी ॥१०॥

देवाचिया खुणा 
दाखवून मना
संशयाच्या तृणा
जाळीयले ॥११॥

भेटविली मज
नर्मदा माऊली 
चित्ती वसवली 
भक्ती तिची ॥१२॥

उघडले जग 
भ्रम विभ्रमाचे
आंतर सुखाचे 
मनोरम ॥१३॥

भेटलो तयांना 
कधी समूहात 
पाऊल स्पर्शात 
धन्य झालो ॥१४॥

भेटल्या वाचून 
भेटलो कितीदा 
हृदयात सदा 
साठविले ॥१५॥

तुटला तो तारा 
दीप विझू गेला
परी उजळला 
मार्ग आत॥१६॥

लाखातला एक 
चाहता विक्रांत 
तया आठवत
नमि आज ॥॥१७॥

भेटतील खास
नर्मदा तटास
वाटते मनास 
उगाचच  ॥१८॥

********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...