शनिवार, ३० जानेवारी, २०२१

सदोदित दत्ता


सदोदित दत्ता
**********
सदोदित दत्ता 
घडो तुझा  संग
चैतन्यची अंग 
होऊनिया ॥१॥
सदोदित दत्ता 
लागो तुझा ध्यास 
हृदयात वास  
घडो तुझा ॥२॥
जगण्याची गाडी 
चालो हवी तर 
पण दूरवर 
फार नको  ॥३॥
अन्न वस्त्रावीन 
अपेक्षा नसावी
कर्तव्ये घडावी 
कृती सारी ॥४॥
मनाचे चलन 
रहावे गुंतून 
तुझिया स्मरण 
मण्यामध्ये ॥५॥
देऊ नको फार 
सांभाळण्या भार
हात माथ्यावर 
तुझा असो ॥६॥
राहा पाठी पोटी 
अंतरीच्या गाठी 
तनमन प्रीती 
होऊनिया ॥७॥
दावी सदोदित 
संतांची पाऊले 
हरवो दाटले 
क्लेश तिथे ॥८॥
तुझिया कृपेचे 
भेटो भक्तगण 
तुझेच भजन 
कानी पडो ॥९॥
जमो गोतावळा 
मैत्र ही अपार 
भक्तीचा आधार 
असलेला ॥१०॥
मग संसारात 
ठेवी हा विक्रांत 
होवो भाग्यवंत 
तुझ्या कृपे ॥११॥
**
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...