शुक्रवार, २२ जानेवारी, २०२१

मद्यपी

मद्यपी
*****

सोडुनीया हात माझा 
दत्ता मज टाकू नको 
मद्यपी जरी करंटा 
गटारात फेकू नको ॥

झोकती मी प्याले इथे 
सुख त्यात झिंगलेले 
घोट घोट रिचवतो 
सवे दुःख तळलेले ॥

सुटता लगाम जैसा 
अश्व जाई उधळला 
जीभ मन मग जाते 
कुचाळांच्या गावाला ॥

पोटातल्या शिव्या येती 
उतूनिया या ओठाला 
मद्य संग टाळ्या पिटी 
आत्मभान नसलेला 

जाणतो तो नरक रे 
खेचला पण जातो रे 
विस्मृतीचे क्षण सुख 
मी मलाच चारतो रे 

उतरता नशा रोज
पिटुनिया डोके घेतो
आतड्यांचा पीळ अन
वेदनात वाकवतो 

ऐकली मी नशा तुझी 
यदु अर्जुने झोकली 
चिंतनात मदालसा
जग सारे विसरली 

येई बाबा हो कलाल 
आस मज ती लागली 
देई नशा तुझी ऐसी
एका घोटी दडलेली 

झिंगलेला विक्रांत ह‍ा
घेत तुज माथ्यावरी 
तुझे नाव गर्जतांना
जाऊ दे जगदांतरी .


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...