शनिवार, २ जानेवारी, २०२१

कृष्णास. .


कृष्णास
********
वर्षानुवर्षे मी येत आहे
कृष्णा तुझ्या मंदिरात  
वर्षोनुवर्ष  ऐकत आहे
देवा  तुझे भागवत.

दुर्लभ तुझे दर्शन
मनोमनी मी जाणतो
आधाराविन कुठल्या
तुला सर्वस्व मानतो

किती वेळा ऐकलेय
तुझे दिव्य जन्म घेणे
पुरातून पार होणे
यशोदेचे सांभाळणे

गोपजनासवे मस्त
गोकुळात बागडणे
वेड्या गोपी राधेसवे
रासलीलेचे  रचणे

एक एक येता दैत्य 
त्यांना सहज वधणे
पुढे मर्दून कालिया
अंति कंस निर्दाळणे

हे सारे लोभसवाणे
करते  मनोरंजन 
तरी पण काही तरी 
वाटते अपुरे पण

तुझे माणूस असणे
तुझे गुणात खेळणे
पायास बाण लागून 
सहज असे मरणे

मामा असून तू तुझ्या
अभिमन्युचे मरणे
खून द्रौपदीपुत्राचे 
निद्रेत संपून जाणे

भीष्म द्रोण यांचे रणी
निरर्थ  जीवन जाणे
बलशाली यादवांचे 
उगा उच्चाटन होणे

होय मी वाचले आहे 
कित्येक ग्रंथ यावर 
जे न येवू देती कधी
आच देवा तुझ्यावर

कर्म गती सांगणारे 
धर्म नीती मांडणारे  
खरंच सांगतो परी
वाटती ती पोकळ रे  . .

तुझ्या चरित्राचा अर्थ 
होता परित्राणाय साधू 
तर मग सांग कसा 
आला तयास तो बाधू 

जरी मज आवडतो 
तू हृदयात वसतो
कळल्यावाचून धुक्याचा 
पण तरंग असतो 

कृष्णा मज कृष्ण कळू दे 
अन् माझा जन्म फळू दे 
चरित्रात त्या दडलेले 
अमृत कण मिळू दे !

**************:*:::
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...