सोमवार, ४ जानेवारी, २०२१

सत्य (poem for a friend who lost her husband in covid )

सत्य  (poem for a friend who lost her husband in covid )
********

सुख असे काय ?
दुःख असे काय ?
तुजलागी काय !
सांगू तरी ॥

भेटले चांदणे 
भोगले अपार 
आजचा अंधार 
क्रमप्राप्त ॥

कुठल्या झाडाची 
किती ती पालवी 
वसंत ठरवी 
आपणचि ॥

मालविता दिप 
अंधार पडतो 
डोळा सरावतो 
पण त्याही 

मंद प्रकाशाची 
ऋजू चांदण्याची 
दौलत लाखाची 
दाखवितो 

तुटतात धागे 
तडतड होते 
वस्त्रही कण्हते 
वियोगाने 

आहे तया हाता
परी सांभाळणे 
जीवनाचे लेणे 
आपणच ॥

भरतील घाव
उद्या वियोगाचे 
आहे जगायचे 
घरासाठी॥
 
कोसळता वृक्ष 
देई फांद्या बुंधा 
आधार तो खंदा 
अजुनही

प्रिय त्या स्मृतीला 
देत धन्यवाद 
चाल आता वाट 
दृढ पणे

याहून अधिक 
काय ते सांगावे 
शरण ते जावे 
तथागता ॥

तयाहून थोर 
कुणाला ते ठावे 
जगती रहावे 
कसे काय ॥

जगी दुःख आहे 
कारणही आहे 
जाणुनिया पाहे 
निवारण ॥

इतुके सांगतो 
विक्रांत थांबतो 
आणिक प्रार्थतो
कळो तुज


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

1 टिप्पणी:

मारूत

मारुत ******  एक रुद्र हुंकार  भेदत जातो सप्त पर्वत  पृथ्वी आप तेज वायू  सारे आकाश व्यापत  थरथरते धरती ढवळतो सागर  उ...