उदयस्त
******
उगवतो सूर्य रोज रोज आणि मावळतो
असे आम्ही उगाचच
रोज रोज रे म्हणतो
खरंतर सूर्य कधी
इथे उगवत नाही
मावळणे बात तर
मग फार दूर राही
पृथ्वीचे फिरणे जर
कधी थांबले असते
तथाकथित हे असे
दिस घडले नसते
तर काय कदाचित
काळ थांबला असता ?
सृष्टीचा चार्ज रिचार्ज
सुद्धा घडला नसता ?
हे नियम जीवनाचे
जगण्याचे मरण्याचे
दिसती जरी युगांचे
असती काय कामाचे ?
उगवता दिस नवा
मी ही नवा उगवतो
अंतरात या तोवरी
तम अज्ञान असतो
तर मग काय इथे
मीच विश्व प्रसवतो
भासमान स्मृतीतून
उभा डोलारा राहतो.
होते आहे अस्तित्वात
जग हे कश्यावरुन
नसे सुर्य चंद्र तारे
काहीच माझ्यावाचून
शब्द शुन्य अर्थशून्य
जगण्याचा भास शुन्य
जी न घडलीच कधी
गोष्ट काय असे अन्य ?
नाव शुन्य गाव शुन्य
विक्रांत हा भाव शून्य
दाटलेल्या व्योमी भासे
घनदाट महाशून्य .
जाणिवेने जाणलेला
लय विलय ही नाही
जाणण्याचे गूढ कोडे
जाणणारा मी ही नाही.
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
**********
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा