शुक्रवार, ८ जानेवारी, २०२१

बळे बळे दत्ता

बळे बळे दत्ता
***********

बळे बळे दत्ता 
तुझ्या दारी येतो  
सोडुनिया लाज 
तुला धरु जातो

नाही रे वैराग्य
नाही ज्ञान भक्ती
तप करण्याची 
इवलीही शक्ती 

नाही संत संग
नाही पारायण 
हिंडतो जगात 
स्वच्छंद मी होत

जर का पाहसी 
लायकी तू माझी 
देवा ती ही नाही 
भक्त खेटरांची 

मिळते गचांडी 
तुझिया दारात 
हाकलती देती
लाथा पेकाटात 

तुझे द्वारपाल 
योगी महाराज 
मज पाहुनिया 
होतात नाराज

परी मी  लोचट
श्वान दारातला 
तुकडे मागत
येतो उंबऱ्याला 

भुंकणे भोगणे
तुज विसरणे 
नित्य जरी घडे 
हेच व्यर्थ जीणे

विक्रांत पतित 
रे पतिताहून 
तयां न आसरा 
तुझ्या कृपेविन

उदारा उद्धरा
पदी द्या आसरा
जाणून घेवून
अजाण लेकरा 
******

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...