रविवार, १७ जानेवारी, २०२१

पतंग




पतंग
*****
प्रारब्धाची चक्री
कर्माची ती दोरी
उडे नभांतरी 
पतंग हा ॥१॥

ताणलेली काडी
अहंने भारली
स्वप्न सजलेली
कागदाची ॥२॥

कधी गरगरे 
कधी भिरभिरे
जीवनाचे वारे 
झेलुनिया ॥३॥

कधी  बसे ताण 
कधी मिळे ढिल 
वारीयाचे बळ 
पेलतांना ॥४॥

चाले काटाकाटी 
मांजा गुंतागुंती
कुणा न माहीती 
कुणा जित ॥५॥

क्षणी फडफडे 
क्षणी घरंगळे 
सोडून थोरले
आकाश ते ॥६॥

वाचून नभाचा
होणे रे नभाचा
जन्म पतंगाचा 
सार्थ तेथे  ॥७॥

आणि खेळविता 
कळताच दत्त 
होणे शांतचित्त  
यथास्थानी ॥८॥

विक्रांते जाणिला 
यत्न साकळला
दत्तास अर्पिला  
सर्वभाव ॥९॥
.********

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ठसा

ठसा **** जया प्रकाशाची हाव   ज्याचे आकाशाचे गाव  त्याचे दत्तात्रेय ठाव  ठरलेले ॥१ जया कळते बंधन  जरा जन्माचे कारण  तया दत्ताचे स...