सोमवार, ११ जानेवारी, २०२१

जीवो जीवस्य

जीवो जीवस्य 
***
एक जीव दुज्या
खातसे जीवाला 
देह दे देहाला 
आकार तो ॥

मरणारा देह 
होतसे खाणारा 
तो ही  उरणारा 
नसे कधी ॥

अन्नाची साखळी
कुणाचा हा खेळ 
पहावया वेळ 
असे कुणा ॥

कुणी खातो एक 
पाळूनया पशु
होऊनिया पशू 
साखळीत ॥

देह मिळे देहा 
पशु कुठे असे 
चैतन्यास कैसे 
कळू जावे ॥

पाण्यातला मासा 
जैसा पाणीयाचा 
अंश तो पाण्याचा 
तैसे होय ॥

कुणास मग ते 
कुणी रे खादले  
कुणाला कळले 
काय कधी ॥

विक्रांत कळणे 
उडाले शून्यात 
नाद आकाशात 
उमटला॥


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...