दत्ताची परीक्षा
*********
दत्ताची परीक्षा
असते कठीण
प्रश्नांविना प्रश्न
उभे पाही
लावुनिया गोड
भोगाची आवड
इंद्रियांचे धेंड
दे धाडून
मना देई मान
प्रस्थ वाढवून
टाकी बुडवून
मस्तीमध्ये
कधी रंग गंधी
कधी सूर शब्दी
लावतसे नादी
अभिजात
अखेर आसक्ती
जमल्या धनाची
घराची दाराची
ठरलेली
प्रश्नाला तयाचा
एकच उत्तर
देतो वारंवार
मीही नित्य
अवघे तुझेच
कृपेने भोगतो
कृपेने सोडतो
दत्तात्रेया
ज्यात माझे भले
तेच घडो दत्त्ता
मजवर सत्ता
चालो तुझी
सदा काठावर
पास हा विक्रांत
धरूनिया दत्त
जगी नांदे
© डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in
https://kavitesathikavita.blogspot.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा