बुधवार, २५ सप्टेंबर, २०१९

नाते

नाते
*****
 खरच नाते काय असते
यावर  मतामतांचे वादळ उठते
प्रतेक मत वेगळे असते
वाट्यास आलेल्या जगण्याचे
त्यावर आरोपण असते
पण अगदी नीटपणे पाहिले
की असे वाटते
कदाचित नाते म्हणजे
गरजांनी बांधलेले जगणे असते
देहाची गरज मनाची गरज
पोटाची गरज घराची गरज
या गरजांची कितीही वजाबाकी केली
तरीहि बाकी उरते ती गरज असते.

तर मग या नात्याचे काय ?
भावनांच्या ओलाव्याचे काय ?
काळजीचे काय ?
विश्वासाचे काय ?
मनातील या हुरहुरींचे काय ?
भयाचे काय ?
पाहता पाहता दिसू लागते
अरे हे सारे मनाच्या रंगभूमीवर
चाललेले नाटक आहे
ज्यात आपण  आहोत नट
आणि आपणच आहोत दिग्दर्शक
अन् प्रेक्षकांची भूमिकाही
आपणच करत अाहोत

हे नाटक असते
अपेक्षांच्या रंगानी रंगवलेले
स्वप्नांच्या पडद्यांनी विणलेले
सुखाच्या दिव्यांनी झगमगणारे
अन् विझताच हे दिवे
एकटेपणाच्या अंधारात भयग्रस्त झालेले
अन् होतात आपली एक्झिस्ट
आपल्या सवेत संपणारे

नात्यांच्या या नाटकाचे
हे गमक कळले की
त्यांची अगतिकता उलगडत जाते
अन् गरजही ध्यानात येते
खरं तर या जगात
कुणीच कुणाचे नसते
हे आपल्यालाही माहीत असते
तरीही आपल्याला नात्यात जगणे आवडते
असला नसला ओलावा टिकवावा असे वाटते
गरजा व निकडीची पलीकडची
एक गरज यात वेटाळून नसते
आपण कोणीतरी आहोत
आपण कुणाचे तरी आहोत
या जाणिवेच्या बुडबुड्यात जगणे
बुडबुडा फुटेपर्यंत तरी
आपल्याला हवे असते
अर्थात हा बुडबुडा
स्वत:च फोडायचे
स्वातंत्र्यही तुम्हाला असते
अन् त्या सोबत जगायचेही
स्वातंत्र्य तुम्हाला असते
पण बुडबुड्याचे फुटणे
कधीतरी अपरिहार्यच असते.
कारण या फुटणेच
तुम्हाला घेवून जाते
 तुमच्या स्वरूपाकडे
ते तुम्हाला कळणे
 हेच जीवनाला.
अभिप्रेत असते
०००
(c) डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...