गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१९

प्रकाश देवता





प्रकाश देवता

***********

खेळ संपता संपता 
गाव अंधारी दाटता 
पाय वळत माघारी
जात घराकडे वाटा

माय उभीसी दारात 
दिवा तिच्या हातात 
मंद प्रकाशात दिसे 
तिचे रूप सोनीयात

शीण दिवसांचा सरे 
जाय लागले खुपले 
धाव घेई तिच्याकडे 
मन प्रेमी आसावले

येई कौतुक डोळ्यात 
रेषा काळजीची मिटे
काही बोलल्या वाचुनी 
लाख आशिषची भेटे

गोष्ट काल कालचीही 
वाटे घडावी आजही
काळ वैरी या जगाचा 
भाग्य थोरले ते नाही


आता नाही तो आकार
माझी प्रकाश देवता 
परी हृदयी तो दिसे 
दीप अजून तेवता 



© डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...