शुक्रवार, ३१ मे, २०१९

ओवळा




ओवळा 
******
सोवळ्या वस्त्राला चाले 
ओवळा तो का रे पैसा 
विटाळतो माणसाला 
माणसाचा स्पर्श कैसा 

जात माणसांची मोठी 
देवाहून असते का ?
घाबरून तुझी माझी 
देव पूजा चालते का ?

जातीपातीचे हे गट 
कळपाचे का रक्षक 
तेच अन्न खातो ना रे 
संत भक्त नि भिक्षुक 

त्याच संवेदना आत
तिच स जाणण्याची 
तीच कळ अंतरात
तुकोबा नि चोखोबाची

दत्ता दे रे मती काही 
रीतभात बदलाची 
सर्व कर्मकांड वर्ण 
गुढी उभार आस्थेची 

दास विक्रांत ओवळा 
विनवितो दत्ता तुला 
असा धर्म देई जगा 
स्वीकारी जो माणसाला 

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे

*****


बुधवार, २९ मे, २०१९

इडा पीडा सारी टळो





इडा पीडा सारी टळो 
दत्त प्रेम उरी झरो
मध्यमेचे महासुख  
चेतनेत माझ्या उरो ॥

उलथून स्वर्ग सारा 
गंगा धरे अवतरो
प्राशितांना पुण्य परा 
मला मीही नच स्मरो ॥

डिंडिंमता अनुहत 
हृदयात असा भरो
कणकण पारा होत 
वारा आर पार सरो ॥

पेटलेल्या वन्हीला त्या
घोट सागराचा पुरो 
स्वप्न सत्य मांडणारे 
वस्त्र अंतरीचे विरो ॥

दत्त स्वप्न विक्रांतचे
दत्ता मध्ये पूर्ण मुरो
भासमान अस्तित्व नि
नाम रूप सारे हरो ॥

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे


मंगळवार, २८ मे, २०१९

जगण्याच्या वाटा






*****

जगण्याच्या वाटा 
दाखव रे मला 
धरून हाताला 
दत्तात्रया
विकाराचे काटे 
कैसे मी टाळावे 
तुजला भेटावे 
कैशा रीती 
पापाचे उतार 
कैसे करू पार 
घेऊन आधार 
दयाघना 
आणि येता चढ 
प्राण मेटाकुटी 
कुठे ती विश्रांती 
घेऊ सांगा
जयाचा तो संग 
होय संतसंग 
शांतीचे अभंग 
भेटो मज 
विक्रांत ओढाळ 
खुळा वाटसरू 
नेई पैल पारू 
मायबापा 
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे


सोमवार, २७ मे, २०१९

तुझ्यावाचून



तुझ्यावाचून
*******:
सरला दिन तुझ्या वाचून 
व्यर्थ जगलो जन्मा येऊन ॥

भांडी घासली या जगताची 
कचरा पाणी गेले वाहून ॥

तेच हिशोब पुन्हा मांडले 
त्याच खर्चात मन सांडून ॥

कळते मजला माझ्यावाचून 
जग चालते युगे होऊन 

तरीही चाले उठाठेव ही
चक्र कुठले पायी बांधून 

नकोस जावू असे सोडून
दत्ता भगवे स्वप्न मोडून 

माळावरती पडली काडी
तुझ्या धुनीत जावी जळून 

जळता देह या जन्मातून 
तुझाच दत्ता जावो होऊन 

आस लागली विक्रांतला या 
आतूर काया जावी मिटून 

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

रविवार, २६ मे, २०१९

का रे उशीर श्रीपादा




का रे उशीर 

पायाखालती वाळू तापली  
नसे माथ्याला कुठे सावली ॥

कंठ सुकला टाहो आटला
चाल चालूनी उर फुटला ॥

त्राण सुटले गात्र थकले 
आणि अवघे यत्न सरले॥

आता केवळ तुझ्या भरोसा 
दिगंबरा रे सरो निराशा ॥

दत्त म्हणता उभा ठाकसी
तुझी ना रे कीर्ती ही ऐसी

मजसाठी मग का उशीर 
धाव श्रीपाद करुणाकर ॥

विक्रांतचे या हसे होवू दे
बोल नावा तव न येवू दे ॥

श्री अवधूता धाव कृपाळा
शरणागता प्रभू सांभाळा‍ ॥

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे

शनिवार, २५ मे, २०१९

दत्ता मित्र दे रे



मित्र दे रे
*****

संवाद साधून 
घेई समजून 
व्यर्थ व्यवधान 
सुटे मग ॥

सुटे अभिमान 
शंकेचे कारण 
मैत्रीचे मरण
होई जेणे॥

देई रे हसून
घेई रे हसून 
उघडी बोलून 
कथा व्यथा ॥

होताच अवघे 
मित्र जिवलग
आनंदाची बाग 
जग होय ॥

दिल्याविना काही 
मिळत ते नाही 
कर्माची ही पाही
रित असे ॥

विक्रांत मैत्रीला 
सदैव भुकेला 
सांगतो दत्ताला 
मित्र दे रे ॥

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे

  



शुक्रवार, २४ मे, २०१९

दत्ता नको असे



देव नोटांची  
*************

दत्ताला नोटांची 
नको असे थप्पी 
मोजतो तो जपी 
तद्रूपता ॥ 

दत्ता नच दावू 
नाणी खुळखुळ
विश्वाला समूळ 
कारक जो 

दत्ता न  पापात  
कधी दे आधार 
शिक्षेला सादर 
होय तिथे 

दत्त नच देत 
दुर्जनास बळ
धावतो  केवळ 
भक्तासाठी ॥

दत्त  ना लोभी 
सोन्याचा कधीही 
विरक्त विदेही
सर्वकाळ ॥

दत्ता नच हवी 
दानाची ती पेटी
आपुल्या आवडी 
भक्त ठेवी 

दत्त नच काळ्या 
पैशात तो भागी 
भक्ति प्रेम मागी  
सदोदित ॥

दत्त कधी वाटा 
कर्माच्या न मोडी
करी खाडाखोडी 
प्रारब्धात॥

दत्त नच साथी 
कुठल्या  सत्तेला 
धार्जीन नफ्याला
वाणीयाच्या ॥

कदा नच  पाही 
परीक्षा दीनांची
पोट ती जयांची 
खपाटीला ॥

दत्तसे फळीला 
दत्तसे भिंतीला 
खिशात ठेवला
प्रेमभरे ॥

दत्त देई अर्थ  
उगा जगण्याला  
विक्रांत मनाला
आसावल्या ॥

******
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मागणे

मागणे ***** आता माझे हे एकच मागणे दत्तात्रयी राहणे घडो यावे ॥ हृदयी धडधड व्हावी दत्त दत्त  स्पर्शात दृष्टीत भरावा तो...